पुणे : सहकारमंत्रिपदाची धुरा सुभाष देशमुख यांच्यासारख्या आक्रमक नेत्याकडे आल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषदेत त्यांच्याशी गुफ्तगू केले. सुमारे पाऊण तास चालेल्या या बैठकीबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली होती. राज्य सहकारी बॅँकेच्या संचालकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी सहकार विभागाची राज्यस्तरीय कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात आयोजित केली होती. दिवसभर जिल्हा परिषदेत पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, यापैकी कोणालाही अजित पवार येणार आहेत, याची कुणकुणही नव्हती. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनाही काही माहीत नव्हते. सायंकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी गेल्यानंतर साडेसातच्या दरम्यान अजित पवार जिल्हा परिषदेत आले. त्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी जिल्हा परिषदेच्या पाचव्या मजल्यावर अध्यक्षांच्या दालनाच्या शेजारी असलेल्या एका छोट्याशा दालनात भेट घेतली. सुमारे अर्धा ते पाऊण तास त्यांनी ही चर्चा केली. पुणे जिल्हा परिषद सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून, गुप्तपणे बैैठक घेणे फक्त येथेच शक्य असल्याचेही बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
अजित पवार यांचे सहकारमंत्र्यांशी गुफ्तगू
By admin | Published: August 13, 2016 5:15 AM