इंदापूर : महाविकास आघाडीतूनअजित पवार गेल्यामुळे झाडाचे पानही हललेले नाही. एकनाथ शिंदे गेल्यामुळे शिवसेना अधिक मजबूत झाली. अशोक चव्हाण गेल्यामुळे आदर्श टॉवर काही खाली आला नाही, तो तसाच आहे. शिवसेनेमुळे निर्माण झालेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली तरी राम ही मते देणार नाही, असे वातावरण या देशात आहे, असा घणाघात शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी
महाविकास आघाडीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. खा. राऊत म्हणाले की, अजित पवारांशिवाय बारामती किंवा महाराष्ट्र अडलेला नाही; पण जे ‘महाविकास’ला सोडून गेले, त्यांच्या जीवनात व राजकारणात जनता अडथळे आणल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई बारामतीची नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेची, स्वाभिमानाची लढाई आहे. पायाखालची वाळू सरकली की, माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो. समोरचा माणूस घाबरला, पराभवाची भीती वाटू लागली, लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत असे भय वाटू लागले की, मग मोदींचा मार्ग सुरू होतो.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘दोन दोन पक्ष फोडून आपण परत आलो,’ अशा आशयाच्या विधानाची ही खा. राऊत यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले की, विकासाची, लोकांची कामे करून मी येथपर्यंत आलो असे लोक सांगतात. मी दोन दोन पक्ष फोडून आलो, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. चार महिन्यांनी देशातले सरकार बदलणार आहे. आमची गॅरंटी आहे, महाराष्ट्रात तुम्ही व केंद्रात मोदी नसणार आहेत. सत्ता आमच्याकडे असेल. ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या दहशतीवर तुम्ही पक्ष फोडले. ही यंत्रणा आमच्या हातात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटलांना मैदानात उतरण्याचे आवाहन
हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागते असे मला वाटत नाही. कारण काही काळापासून पाटील अस्वस्थ आहेत. त्यांच्या मनातील शांतता भाजपने संपवली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा वेळी कोणत्याही मराठी नेत्याने अगर माणसाने शांत झोपू नये. जो शांत झोपला तो महाराष्ट्राचा दुश्मन आहे. तुम्ही या मातीतले मराठी माणूस म्हणून सांगायला लायक नाही आहात. मराठी अस्मितेसाठी मैदानात उतरा, असे आवाहन खा. राऊत यांनी हर्षवर्धन पाटील यांना केले.