पुणे : ‘‘आम्हाला पाच वर्षांतून एकदा निवडणुकीची परीक्षा द्यावी लागते. येत्या दोन वर्षांत २०१७ ला पुणे महापालिका निवडणुकीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाची परीक्षा असून, ते विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण होतील,’’ अशी आशा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी व्यक्त केली. अजित प्रतिष्ठानच्या युवा पुरस्काराचे वितरण तटकरे यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. अभिनेत्री संस्कृती बालगुडे, राज्यात युपीएससी परीक्षेत प्रथम आलेली अबोली नरवणे, कब्बड्डीपटू किशोरी शिंदे, सीए किशोरी भराडिया यांना अजित युवा पुरस्काराने स्मृतीचिन्ह व रोख १० हजार रुपये देवून गौरविण्यात आले. जलतरणपटू रोहन मोरे यांच्या वतीने त्यांच्या बहिणीने पुरस्कार स्वीकारला. महापौर दत्तात्रय धनकवडे, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, सभागृहनेते बंडू केमसे, स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश गोळे, मृणाल ववले आदी उपस्थित होते. ‘आम्हालाही राजकारणात वेगवेगळ््या भूमिका म्हणजे अभिनय करावा लागतो. मात्र, अजित पवार यांचा अभिनय सरळ असल्याने त्यांना ‘अँग्रीमॅन’ म्हणून ओळखले जाते,’ अशी टिप्पणी तटकरे यांनी केली. त्यावेळी सभागृहात हशा पिकला. आई-वडील आणि पुणेकरांच्या प्रोत्साहनामुळे इथपर्यंत पोहचू शकले. पुण्यासारखे प्रेक्षक मुंबई नव्हे, तर कुठेच नाहीत? अशी भावना बालगुडे यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी प्रास्ताविक केले.
महापालिका निवडणुकीत अजित पवार यांची परीक्षा
By admin | Published: July 23, 2015 4:30 AM