नातेवाईक चालवत असलेल्या कारखान्यावरील कारवाईबाबत अजित पवारांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 02:12 PM2021-07-02T14:12:43+5:302021-07-02T14:14:41+5:30

अजित पवारांचीही ईडी चौकशी होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तरे देत या कारखान्यासंदर्भात इतंभू माहिती दिली. 

Ajit Pawar's explanation regarding ED action taken against the factory run by relatives | नातेवाईक चालवत असलेल्या कारखान्यावरील कारवाईबाबत अजित पवारांचं स्पष्टीकरण

नातेवाईक चालवत असलेल्या कारखान्यावरील कारवाईबाबत अजित पवारांचं स्पष्टीकरण

Next
ठळक मुद्देगुरू कमोडिटीचे मुंबईतील ओंकार असं काहीतरी त्यांचं नाव आहे. त्यांच्या कंपनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.

पुणे - महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे. ईडीकडून येथे झालेल्या कारवाईशी माझा काहीही संबंध नाही, असेही ते म्हणाले.   

जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी सहकारी कारखाना होता. मात्र, महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने त्या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. नंतर तो कारखाना खासगीरित्या विकत घेतला गेला. सध्या अजित पवारांचे निकटवर्तीय हा कारखाना चालवत होते. त्यामुळे आता अजित पवारांचीही ईडी चौकशी होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तरे देत या कारखान्यासंदर्भात इतंभू माहिती दिली. 

ईडीकडून गुरू कमॉडिटीसंदर्भात काही चौकशा सुरू आहेत, त्यामुळे त्यांनी या कारखान्याची माहिती घेतली. मात्र, सध्या हा कारखाना जरंडेश्वरद्वारे चालविला जात आहे. गुरू कमोडिटीचे मुंबईतील ओंकार असं काहीतरी त्यांचं नाव आहे. त्यांच्या कंपनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे. आम्हाला पण प्रपंच, परिवार आहे. जरंडेश्वरच्या डायरेक्टरने ईडीच्या ऑफिसरला सर्वकाही दाखवलं आहे. नियमाच्या आधीन राहूनच या कंपनीला कर्जवाटप करण्यात आलं आहे. आम्ही यापूर्वी काही कंपन्यांवर डायरेक्टर होतो, पण डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी देशातील सर्वच मंत्र्यांना एखाद्या कंपनीच्या डायरेक्टरपदी न राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी, आम्ही ते पद सोडून दिले, असेही अजित पवार यांनी सांगितलं.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने कारखान्याची विक्री

मुंबई उच्च न्यायालयाने हा कारखाना विक्रीस काढला होता, त्यामुळे तो बळकावण्याचा विषयच नाही. माझ्यावर यापूर्वीपासूनच असे आरोप झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वात जास्त किंमतीला जरंडेश्वर साखर कारखाना विकला असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. 12 ते 15 कंपन्यांपैकी मुंबईतील गुरू कमोडिटी या कंपनीने जादा दराने 65 कोटी 75 लाख रुपये दराने टेंडर भरल्यामुळे हा कारखाना या कंपनीला विकला गेला होता.

राजेंद्र घाडगे सध्या कारखाना चालवतात 

बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड यांनी गुरुशी संपर्क साधून हा साखर कारखाना चालवायला घेतला. पहिल्याच वर्षी त्यांना जवळपास 4 ते 5 कोटी तोटाच झाला. त्यामुळे, माझे नातेवाईक आहेत, राजेंद्र घाडगे यांनी हा कारखाना चालवायला घेतला, त्यांनाही 2 वर्षे तोटाच झाला. त्यानंतर, त्यांनी बँकांशी चर्चा करुन रीतसर परवानग्या घेऊन कर्ज काढून विस्तारवाढ केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. जरंडेश्वर साखर कारखाना न्याय मागण्यासाठी संबंधित ठिकाणी जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं. 

शालिनीताई पाटील यांचा आरोप

थकीत कर्जापोटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केलेल्या चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा नाममात्र किमतीत लिलाव करून मुंबईच्या गुरु कमोडिटीज कंपनीला विकला होता. बँकेने अन्यायकारक भूमिका घेत कारखाना आपल्याकडून हिसकावून घेतल्याचा आरोप करत कारखान्याच्या संस्थापिका माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी गेली १८ वर्षे अविरत लढा दिला आहे. विविध न्यायालयांमध्ये त्यांनी धाव घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखाना परत मिळवायचाच, असा चंग त्यांनी या वयातसुद्धा बांधला आहे. डॉ. शालिनीताई पाटील यांनी कोरेगावसह खटाव तालुक्यात गावोगावी जाऊन भागभांडवल उभारत चिमणगावच्या माळावर १९९९ मध्ये साखर कारखाना उभा केला.
 

Web Title: Ajit Pawar's explanation regarding ED action taken against the factory run by relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.