पिंपरी : राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस असे आम्ही महाविकास आघाडी म्हणून महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असून प्रत्येक मित्र पक्षाने आपल्या ताकदीनुसार, व्यवहार्य जागा मागाव्यात. काहीही मागायला लागले तर जमणार नाही. एकला चलो रे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नये, असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे शुक्रवारी दिला.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात मेळावा झाला. त्यात पवार बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात सुरू असणारे राजकारण, महापालिका निवडणूक, हनुमान चालिसा, हनुमान जन्मस्थळ यावरून सुरू असणारा वाद, राज ठाकरेंचे आंदोलन यावर भाष्य केले.
अजित पवार म्हणाले, ‘‘जाती धर्माचे विष पेरण्याचे काम काही लोक करीत आहेत. त्यांच्या मागे आपल्या कार्यकर्त्यांनी फरपटत जाऊ नये. जातीचे विष पेरण्यामध्ये कोणती शक्ती आहे, कोणाचे डोके आहे. हे आपल्याला माहित आहे. मुंबईत पवार साहेबांच्या घरावर हल्ला आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यास मारहाण करणे चुकीचे आहे. शरद पवारांचा कोणताही आणि काहीही संबंध नसताना घरावर हल्ला केला गेला, ही बाब चुकीची आहे. चुकणाऱ्यांना शिक्षा मिळेलच.
पुढे पवार म्हणाले, आपल्या धर्मानुसार कोणाला काय धार्मिक विधीकरायचे असेल, तो अधिकार दिला आहे. कोणाला हनुमान चालिसा करायचा असेल? तो त्यांनी आपल्या घरी करावा. दुसऱ्यांच्या घरी जाऊ नये. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणायचा अट्टहास का? मला धार्मिक कार्य करायचे असेल, तर मी काटेवाडीच्या घरी किंवा देवगिरीवर करेल. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी. महागाई आणि बेरोजगारी या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे.’’
चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई-हनुमान चालिसा केला म्हणून राणा कुटुंबावर कारवाई झाली. राज ठाकरे भोंग्याच्या मुद्द्यावर जातीय राजकारण केले जात आहे. त्यांच्यावर कारवाई होत नाही. सरकार ठाकरे यांना घाबरते का? या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘‘सरकार कोणालाही घाबरत नाही. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार. कोणतीही कारवाई करताना कायदेशीर बाबी, तपासून पोलीस कारवाई करीत असतात. मग तो कोणत्याही पक्षाचा असो.’’महाराजच मारायला लागले तर...हनुमान जन्मस्थान वादावर पवार म्हणाले, ‘‘आता हनुमान जन्मस्थळावरून नवा वाद सुरु झाला आहे. त्यांचे जन्मस्थळ कोठले. यावरून आता महाराजच एकमेकांना मारायला लागले तर काय करायचे.’