आमदारकीचे स्वप्न भंगल्याने पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी थंड; पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकर्तेही शांत
By राजू इनामदार | Updated: March 29, 2025 15:47 IST2025-03-29T15:47:16+5:302025-03-29T15:47:51+5:30
दोन सत्तेची पदे असतानाही शहरात त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने पदाधिकारी विधानपरिषदेची आमदारकी पुणे शहराला मिळावी म्हणून आग्रही होते

आमदारकीचे स्वप्न भंगल्याने पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी थंड; पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकर्तेही शांत
पुणे: विधानपरिषदेच्या ५ जागा रिक्त झाल्या, त्यातील पक्षाकडे आलेली एक जागा पुणे शहराला मिळेल या अपेक्षेवर पाणी पडल्याने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष थंड झाल्याचे दिसते आहे. पक्षाकडून आरोपांना दिली जाणारी प्रत्युत्तरे तसेच वेगवेगळ्या प्रश्नांवर होणारी आंदोलने थांबली असून पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकर्तेही शांत झाले आहेत.
पक्षाला निवडून आलेले चेतन तुपे हे आमदार आहेत, मात्र त्यांचा हडपसर हा मतदारसंघ शहराचे उपनगर आहे. तुपे महापालिकेचे नगरसेवक होते, एकत्रित राष्ट्रवादीत पुणे शहराचे अध्यक्षही होते, फुटीनंतर महिनाभराचा विलंब लावून अखेर त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. आता दुसऱ्या वेळी आमदार झाल्यावर त्यांनी शहरातील लक्ष एकदम कमी करून टाकले आहे. त्यामुळेच शहरातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना शहरात आमदारकी हवी होती.
राज्याच्या सत्तेतील महिला आयोगाचे अध्यक्षपद पक्षाच्या रुपाली चाकणकर यांच्याकडे आहे. त्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्ष होत्या. त्यानंतर प्रदेश महिला अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांना त्यावेळीच महिला आयोगाचे अध्यक्षपद दिले गेले. फुटीनंतर त्या अजित पवार यांच्याबरोबर गेल्या. तिथे त्यांचे महिला आयोगाचे अध्यक्षपद कायम राहिले. इतकेच नव्हे तर सत्ताप्राप्तीनंतर त्यांना दुसऱ्या वेळीही ते पद दिले गेले. मात्र त्याही शहराचे उपनगर असलेल्या धायरीमधील आहेत. त्यांना दुसऱ्यांदा पद देण्यास शहरातून विरोध झाल्याने त्यांनीही शहरातून लक्ष काढून घेतले आहे.
दोन सत्तेची पदे असतानाही शहरात त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते विधानपरिषदेची आमदारकी पुणे शहराला मिळावी म्हणून आग्रही होते. शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे नाव त्यासाठी चर्चेत होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तशी मागणीही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. मात्र पवार यांनी त्याकडे लक्षच दिले नाही. पक्षाकडे आलेली एकमेव जागा पवार यांनी लगेचच दुसऱ्या जिल्ह्याला दिली. त्यामुळेच इथलेच सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यातून त्यांना मरगळ आली आहे. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून वारंवार आंदोलने केली जातात. त्यांना प्रत्युत्तर देण्याचे काम अजित पवार गटाकडून जोरात केले जात होते. ते आता जवळपास बंदच झाले आहे.