राज्यातील 'या' ७ जागांवर अजित पवारांचे उमेदवार?; पुण्यातील बैठकीत झाले मंथन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 04:43 PM2024-03-26T16:43:20+5:302024-03-26T16:56:14+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली
पुणे - देशातील राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून महाराष्ट्रातही सर्वच पक्षांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना राज्यात रंगत आहे. त्यातच, यंदा प्रथमच निवडणुकीत दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना पक्ष आमने-सामने आहेत. त्यामुळेच, जागावाटपात पक्षप्रमुखांची कसरत होतानाचे पाहायला मिळत आहे. भाजपाने आत्तापर्यंत २३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. तर, काँग्रेसनेही १२ उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, अद्यापही जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला पुढे आला नाही. पण, महायुतीतील राष्ट्रवादीने ७ जागांवर तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. रायगडमधून सुनिल तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून राज्यातील ७ जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबत चर्चा झाल्याचंही पुण्यातील बैठकीनंतर अजित पवारांनी स्पष्ट केलं. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी स्वत: आणि महायुतीतील इतर घटकपक्षांचे महत्त्वाचे नेते २८ मार्च रोजी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या सर्व जागांवरील उमेदवार घोषित करतील, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.
महादेव जानकर यांच्या अचानक महायुतीत येण्याने बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेवाराच्या नावाबाबत अनेक चर्चा होत आहेत. त्याच अनुषंगाने अजित पवार यांनी सूचक विधान केलं. सध्या मी बारामतीचा सस्पेन्स ठेवतो, मात्र तुमच्या मनात जे नाव आहे, तीच व्यक्ती बारामतीतून उमेदवार असेल, असं म्हणत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे, पुढील २ दिवसांतच महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेला पूर्णविराम बसणार आहे. मात्र, तत्पूर्वी आजच्या पत्रकार परिषदेतून अजित पवार यांनी ७ जागांवर दावा केला असून सातारा लोकसभेच्या जागेवरही दावा केला आहे.
बारामती, शिरूर, सातारा , धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. परभणीचा उमेदवार दोन दिवसात ठरणार. महादेव जानकर यांना राष्ट्र्वादी पाठिंबा देणार ही केवळ अफवा असून ती विरोधकांनी पसरवली आहे. कोणत्याही परिस्थितीत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही, असेही स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.