अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर; बारामती आणि शिरूरबद्दलही सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 03:29 PM2024-03-26T15:29:46+5:302024-03-26T15:31:20+5:30
अजित पवार यांनी सूचक भाष्य करत बारामतीतून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
Ajit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी स्वत: आणि महायुतीतील इतर घटकपक्षांचे महत्त्वाचे नेते २८ मार्च रोजी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे सर्व जागांवरील उमेदवार घोषित करतील, अशी माहितीही अजित पवारांकडून देण्यात आली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून नक्की कोण निवडणूक लढवणार, याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. या मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मागील काही दिवसांपासून प्रचार करत आहेत. मात्र महायुतीकडून धक्कातंत्राचा अवलंब करत इथून रासपच्या महादेव जानकर यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. याबाबत अजित पवार यांनी सूचक भाष्य करत सध्या मी बारामतीचा सस्पेन्स ठेवतो, मात्र तुमच्या मनात जे नाव आहे, तीच व्यक्ती बारामतीतून उमेदवार असेल, असं म्हणत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शिरूरमध्ये पक्षप्रवेशानंतर तेथील उमेदवाराच्या नावाची घोषणा करू, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील हेच शिरूरमधून महायुतीचे उमेदवार असतील, हे आता जवळपास निश्चित झालं आहे.