अजितदादांचा आदेश धुडकावणे पडणार चांगलेच महागात; बारामती पोलीस आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 05:02 PM2021-02-23T17:02:23+5:302021-02-23T19:38:49+5:30
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाल्याचे चित्र बारामतीत सोमवारी (दि.२२) पाहावयाला मिळाले होते.
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत दिलेला आदेश धड्कावून लावण्याचा प्रकार बारामतीतच उघडकीस आला होता. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाल्याचे चित्र बारामतीत सोमवारी (दि.२२) पाहावयाला मिळाले होते. या प्रकारानंतर सर्वच स्तरातून प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात होती. आता मात्र बारामती पोलिसांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला असून कोरोना नियम धाब्यावर बसवत गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाल्याचे चित्र बारामतीत सोमवारी (दि.२२) पाहावयाला मिळाले होते . कोरोनाच्या नियमांचा सर्वांनाच विसर पडल्याचे चित्र आहे.
याबाबत बारामती पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर म्हणाले, सोमेश्वर कारखाना निवडून अर्ज भरण्यासाठी प्रशासकीय भवनमध्ये गर्दी करणाऱ्याची माहिती घेतली जात आहे. माहिती पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
अजित पवारांनी काय दिला होता इशारा...
बारामतीत झालेल्या कार्यक्रमात कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन अजित पवारांनी केले होते. कोरोनाची भीती संपल्यासारखे अनेकजण मास्क न वापरता वावरत आहेत. मास्कचा वापर, सॅनिटायझर्सचा वापर करणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शासनाने गर्दीबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी नियमावलीचे सर्वांनी पालन करावे. एकदा कोरोना झाला की पुन्हा कोरोना होणारच नाही, अशा समजूतीत राहू नका, दोनदा नाही काहींना तर तीनदा कोरोना झाल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या,असा इशारा देखील पवार यांनी दिला होता.
.......
मास्क न वापरल्याप्रकरणी ८० जणांवर दंडात्मक कारवाई
सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती.लोकशाहीमध्ये अर्ज भरण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.त्यामुळे आपण कोणाला रोखु शकत नाही.मात्र, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडुन १०० रुपये दंड वसूल करण्यात येत होता. आता तो दंड प्रत्येकी ५०० रुपये करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यावर बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांकडेच पावती पुस्तक देण्यात आले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे शहर पोलीसांनी सांगितले.