अजित पवारांचा सकाळी ६ वाजताच फोन अन् कार्यकर्ते लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 06:50 PM2022-10-19T18:50:43+5:302022-10-19T18:52:01+5:30

अजित पवार यांनी फोनवरून तातडीने मदतकार्य हाती घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या...

Ajit Pawar's phone at 6 am; Instructions for immediate relief to flood victims | अजित पवारांचा सकाळी ६ वाजताच फोन अन् कार्यकर्ते लागले कामाला

अजित पवारांचा सकाळी ६ वाजताच फोन अन् कार्यकर्ते लागले कामाला

Next

बारामती (पुणे) : नाझरे जलाशयाच्या पाणवठा परिसरात अतिमुसळधार पाऊस आल्यामुळे बारामती शहरात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने पहाटेपासूनच नागरिकांना जागरुक राहण्याचे आवाहन केले होते. कऱ्हा नदीच्या पात्रात ३५ हजार क्युसेकने पाणी सोडल्याची माहिती मिळताच बारामतीत प्रशासनासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भल्या सकाळीच पूरग्रस्त भागात पोहोचले. याचवेळी मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फोनवरून तातडीने मदतकार्य हाती घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या.

त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने हाती घेतलेल्या मदतकार्याची पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्याची माहिती बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जय पाटील यांनी दिली. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, शहरातील पंचशीलनगर, खंडोबानगर येथील घरांमध्ये प्रशासन शिरले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सकाळी ६ वाजताच याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मदतीसाठी पोहोचण्याचे आदेश दिले. ज्या परिसरात नदीचे पाणी शिरले आहे, त्या १५० ते १७५ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्यासाठी नगरपरिषद प्रशासनासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सर्व कार्यकर्ते प्रशासनाला खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.

पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी निवारा देण्यात आला आहे, तसेच सर्वांची राष्ट्रवादीच्या वतीने जेवणाची सोय करण्यात आली आहे. अजूनही पाणी शिरलेल्या भागात कोणाची गैरसोय झाली असेल तर त्याची माहिती घेण्यात येत आहे. पूरग्रस्तांना पूरस्थिती पूर्ववत होईपर्यंत आवश्यक ती मदत पुरविण्यात येईल. अजित पवार यांनी याबाबत कोणाचीही गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष पुरविण्याचेदेखील आदेश दिले आहेत. त्यानुसार पूरग्रस्तांना मदत न मिळाल्यास मुख्याधिकारी, तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी केले आहे.

अतिमुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीत बारामती शहरातील पंचशील नगर येथील २५ कुटुंबांना समाज मंदिर येथे, खंडोबानगर येथील ४३ व जळगाव क. प. येथील २२ कुटुंबांना मंगल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले. त्यांच्या निवाऱ्याची व जेवणाची सोय प्रशासनाने केली. सकाळी ६ वाजल्यापासूनच नगरपरिषदेचा वसुली विभाग वगळता २०० पेक्षा जास्त कर्मचारी पूरग्रस्तांना मदतकार्यात सहभागी झाल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

Web Title: Ajit Pawar's phone at 6 am; Instructions for immediate relief to flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.