अजितदादांचा राजकीय संन्यास अमान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 01:30 PM2019-11-27T13:30:42+5:302019-11-27T13:43:28+5:30
मंगळवारचा दिवस राज्याच्या राजकारणासह बारामतीकरांसाठी ऐतिहासिक असाच ठरला.
बारामती : राज्याच्या राजकारणासह बारामतीकरांसाठी मंगळवारचा (दि. २६) दिवस राज्याच्या राजकारणासह बारामतीकरांसाठी ऐतिहासिक असाच ठरला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारची वाट सुकर झाली. तसेच पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येण्याचे संकेत या वेळी मिळाल्याने बारामतीकर आनंदून गेले खरे, मात्र, हा आनंद काही काळापुरताच ठरला. राजकीय संन्यास घेण्याच्या अटीवर अजितदादांनी हा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने बारामतीकर पुन्हा अस्वस्थ झाले. त्यांची ही अट अमान्य असल्याचे सांगत पुढील निर्णय घेण्याचा अधिकार बारामतीकरांचा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, अजितदादांना आता राजकीय संन्यास घेता येणार नाही. बारामतीकरांनी नेहमीच त्यांना राज्यातील सर्वात मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे. आता इथून पुढील निर्णय घेण्याचा अधिकार हा आता बारामतीकरांचा आहे. त्यामुळे आता त्यांनी निर्णय नाही घ्यायचा. त्यांना आम्ही तसे करू देणार नाही. त्यांच्यावर आमचा तेवढाच अधिकार आहे. गरज पडल्यास सगळे बारामतीकर दादांच्या प्रेमापोटी रस्त्यावर उतरतील.
माजी नगराध्यक्ष योगेश जगताप म्हणाले, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली होणाºया नवीन सरकारमध्ये अजितदादांना उपमुख्यमंत्री म्हणून पाहण्याची आम्हा कार्यकर्त्यांची इच्छा आहे. खºया अर्थाने ‘साहेबां’ची ध्येयधोरणे व विकासकामे या महाराष्ट्राला दाखविण्यासाठी दादाच हवे आहेत. मागील ५ वर्षातील विकासाचा ‘बॅकलॉग’ ते भरून काढतील. पवार कुटुंबीय एकत्र आल्याचा आम्हा कार्यकर्त्यांना आनंद आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर म्हणाले की, दादांच्या कामांचा विकास सगळ्यांनी पहिला आहे. त्यांच्या नेतृत्वाची समाजाला गरज आहे. दादा असा काही निर्णय घेणार नाहीत. बारामती विधानसभा काँग्रेसचे युवक अध्यक्ष वैभव बुरुंगुले म्हणाले, अजितदादांनी स्वगृही यावे व राजकारणात सक्रिय व्हावे तसेच राज्याच्या विकासासाठी सक्रिय राहावे.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष राहुल जाधव म्हणाले, आम्ही दादांच्या भूमिकेबरोबर आहोत. दादांनी संन्यास घेतल्यास आम्ही पण संन्यास घेणार. मात्र, दादांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याची आम्ही वाट पाहत आहोत. त्यांची भूमिका आम्हाला मान्य आहे. अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव म्हणाले, अजित पवार यांनी राजकीय संन्यास घेणार म्हटले तरी,आम्ही बारामतीकर त्यांना घरातून हाताला धरून आणू. त्यांच्या विकासाचा अजेंडा हा राज्यातील कोणाही नेत्याकडे नाही.
..................
..त्यांचे नाव उपमुख्यमंत्री म्हणून पुढे येऊ शकते
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. राजेंद्र काळे यांनी सांगितले, की अजित पवार यांनी आज पवारसाहेबांना भेटल्यावर राजीनामा दिला. ते राजकीय संन्यास घेणार नाहीत. दोन दिवसांत याबाबत चित्र स्पष्ट होईल. अजित पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री म्हणून पुढे येऊ शकते..
...........
राष्ट्रवादीकडून लाडूवाटप करत आनंदोत्सव
महाविकास आघाडी सरकारचा मार्ग सुकर झाल्याने, तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरविले. एमआयडीसीतील पेन्सिल चौकात अनेकांनी या घडामोडीबद्दल आनंद व्यक्त केला.