अजित पवारांचा महायुतीतील नेत्यांना घरचा आहेर?; मुस्लीमविरोधी वक्तव्यांवर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 02:54 PM2024-09-12T14:54:36+5:302024-09-12T14:56:51+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लीम समाजाबाबत होणाऱ्या वक्तव्यांवरून संताप व्यक्त केला आहे.
NCP Ajit Pawar ( Marathi News ) : महायुतीत जागावाटपासह विविध मुद्द्यांवरून मतभेद होत असल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लीम समाजाबाबत होणाऱ्या वक्तव्यांवरून संताप व्यक्त केला आहे. "एखाद्या समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल कोणीतरी अतिशय वाईट बोलतो. मात्र आम्ही अशा गोष्टींशी सहमत नाही. आमचा अशा गोष्टींना विरोध आहे. मतभेद असू शकतात, मात्र एखाद्या समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही," असा इशारा अजित पवारांनी आळंदी इथं बोलताना दिला आहे.
महायुतीतील भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य काही नेते विविध घटनांवर बोलत असताना मुस्लीम समाजावर आक्रमक भाष्य करत असतात. असं असतानाच आता अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. "जाती-धर्माविरुद्ध बोलून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल," असं त्यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निकालाचा धसका?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीलाही दारुण पराभवाचा सामना करावा लागला. भाजपसोबत युती केल्याने अजित पवारांच्या पक्षासोबत असणारा मुस्लीम मतदार दुरावल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलं. त्यामुळे मुस्लीम समाजाला पुन्हा जवळ करण्यासाठी अजित पवार हे प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. विशाळगड इथं झालेल्या घटनेनंतरही अजित पवार यांनी मुस्लीम बांधवांना भेटून आपण त्यांच्यासोबत असल्याचं दाखवून दिलं होतं.