पुणे : मला बीग बी म्हटल्याबद्दल संजय रावतांचे धन्यवाद, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी पुण्यात बोलताना दिली. महाविकास आघाडीबद्दल उद्धव ठाकरेंना विचारणार आहे. सध्याच्या परिस्थितीवर विचार करू. उन्हामुळे महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पुढे ढकलण्यात आली आहे, असंही पवार म्हणाले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samithi) या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहे. विशेषकरून गेल्या काही दिवसांपासून पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यात हे प्रयत्न अधिक होताना दिसत आहेत. नांदेड जिल्ह्यात त्यांच्या सभाही झाल्या आहेत.
बीआरएसच्या वाढत्या प्रभावावर पवार काय म्हणाले?
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, यापूर्वी मायावती, मलायमसिंह यादव यांनीही त्यांचे पक्ष वाढविण्याचे प्रयत्न केले आहेत. पण त्यांना त्यात यश म्हणावे असे यश मिळाले नव्हते. आता के. चंद्रशेखर राव यांना कदाचित देश पातळीवरील नेता व्हायचं असेल म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू असतील. एका राज्याचे मुख्यमंत्री संभाळले म्हणजे त्यांना दुसऱ्या राज्यातही यश मिळेल असं म्हणता येत नाही. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे.
राज्यातील सरकारही जाहिरातबाजीत व्यस्त-
पुढे बोलताना पवार म्हणाले, सध्या राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) लढल्या जातील. भविष्यातील निवडणुकांमध्ये ज्यांना तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नाही असे बरेच लोक बीआरएस या पक्षात जात आहेत. सध्या देशात महागाई प्रचंड असताना के. चंद्रशेखर राव यांच्या जाहिरातबाजीसाठी एवढ पैसा कुठून आला याचा महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. विकासकामे करण्यापेक्षा सध्या फक्त जाहिरातबाजी केली जातेय. यामध्ये महाराष्ट्रातील राज्य सरकारही जाहिराती करण्यात व्यस्त आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे.
आदिपुरुष चित्रपटावर काय म्हणाले अजित पवार?
अशा चित्रपटाबद्दल विनाकारण चर्चा करू नये. या वादांवर कशाला चर्चा केली जात आहे? जर त्या चित्रपटांवर वाद निर्माण झाला तर त्या चित्रपटांना फायदा होतो. त्यामुळे अशा गोष्टींवर चर्चा करू नये, असं पवार म्हणाले.