पुणे/बारामती : शहरात रविवारी(दि २७) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धावता दौरा चर्चेचा विषय ठरला. कारण उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले. तसेच मैदानावर काही काळ बॅटींगदेखील केली. यावेळी बारामतीकरांनी टाळ्या वाजवत पवारांच्या खेळीचे कौतुक केले. तर, मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी अजित पवारांना बॉलिंग टाकली.
पवार कुटुंबिय आणि बारामतीचे वेगळे नाते आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्या आजच्या बँटींगने हे नाते अधोरेखित झाले. सतीश खुडे हा कार्यकर्ता दरवर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करतो. यंदा देखील त्याने हे सामने भरवले आहेत. त्यासाठी मुंबईत जनता दरबारात पोहचत उपमुख्यमंत्री पवार यांना मैदानावर येण्याची विनंती केली.
पवार यांनी देखील रविवारी धावपळीच्या दौऱ्यात वेळ दिला. व्यस्त दिनक्रमातुन वेळ काढत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट स्टेडीयमवर दिलखुलासपणे मैदानावर बॅटींग करीत या सामन्यांचे अजित पवार यांनी उद्घाटन केले. व्यासपीठावरही जात क्रिकेटपटुंशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर ते काटेवाडी कडे मार्गस्थ झाले.