Ajit Pawar: अजित पवारांचा पीडीसीसी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा, आता संधी कुणाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 07:12 PM2023-10-10T19:12:50+5:302023-10-10T19:13:24+5:30
अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्याने आता त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ...
- दुर्गेश मोरे
पुणे : राज्यातील पक्ष संघटनेची वाढती जबाबदारी, उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप यामुळे पुरेसा वेळ मिळत नसल्याच्या कारणामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिल्याने आता त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
1991 पासून अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठी आर्थिक प्रगती केली आहे. बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून अजित पवार हे गेली 32 वर्षे बँकेचे प्रतिनिधित्व करत होते. बँकांमध्ये देशातील सर्वात अग्रगण्य बँक म्हणून पुणे जिल्हा बँकेचा नावलौकिक आहे.
अजित पवारांच्या मार्गदर्शनाखालीच काम होणार-
अजित पवार 1991 मध्ये जिल्हा बँकेचे संचालक झाले, त्यावेळेस बँकेचा एकूण व्यवसाय 558 कोटी रुपये इतका होता मात्र अजित पवारांनी सूत्र हाती घेतल्यानंतर या बँकेचा व्यवसाय 20 हजार 714 कोटी रुपये इतका विस्तारला आहे. हा व्यवसाय देखील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वाधिक आहे. संचालक पदाचा आजोत पवार यांनी राजीनामा दिला असला तरी यापुढील काळात देखील जिल्हा बँक त्यांच्याच नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली काम करेल असे दिगंबर दुर्गाडे यांनी स्पष्ट केले आहे.