Ajit Pawar: ससूनच्या अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत अजित पवारांचे मौन
By नितीन चौधरी | Published: October 20, 2023 04:07 PM2023-10-20T16:07:08+5:302023-10-20T16:09:45+5:30
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते...
पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे शुक्रवारी (दि. २०) प्रथमच माध्यमांसमोर बोलले. मात्र, ससूनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याबाबत बोलण्याचे टाळून पोलिस यासंदर्भात चौकशी करत आहेत, अशी भूमिका त्यांनी वारंवार पत्रकारांसोबत घेतली. गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात सविस्तर विधान केले आहे. तीच राज्य सरकारची भूमिका आहे. चौकशीनंतर वस्तुस्थिती समोर येईल अशी माहिती दिली.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ललित पाटील प्रकरणात ससूनच्या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे विचारले असता पोलिस यासंदर्भात चौकशी करत आहेत. त्याला अटक करून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीदेखील दिली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात संपूर्ण चौकशीची चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर वस्तुस्थिती समोर येईल. या प्रकरणात आरोपीनेच आरोप केले आहेत, त्याबद्दल चौकशी करून काय झाले, कसे झाले, अशा बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत. तसेच बातम्यांमधूनही काही बाबी समोर आल्या आहेत. गृहमंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली.
या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही मंत्र्यांवर आरोप केले आहेत, त्याबाबत विचारले असता पवार म्हणाले विरोधी पक्ष आता सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत. त्यातून काहींनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारादेखील दिला आहे. या सर्व बाबींची चौकशी करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर काय नेमके घडलेले आहे, ते आपल्या सर्वांच्या समोर येईल असेही ते म्हणाले.