अजित पवारांचे कट्टर समर्थक शैलेश मोहितेंचा उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 09:34 AM2024-01-22T09:34:25+5:302024-01-22T09:35:18+5:30
आमदार दिलीप मोहिते - पाटील आणि आमचे घरचे संबंध चांगले आहेत, पण राजकारणात आमची वेगळी भूमिका
शेलपिंपळगाव : पुण्यात अजित पवार गटाला ठाकरे गटाने आणखी एक धक्का दिला आहे. एकेकाळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेले डॉ. शैलेश मोहिते - पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तळेगाव दाभाडे येथे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत पक्ष प्रवेश केला आहे. विशेषतः शैलेश मोहितेंच्या प्रवेशाने खेड तालुक्यात उद्धव ठाकरे गटाला ताकद प्राप्त होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे नेते तथा खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते - पाटील यांचे एकेकाळी शैलेश मोहिते हे अत्यंत विश्वासू व जवळचे शिलेदार होते. आमदारांचे पुतणे म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. एकीकडे मावळमधील अजित पवारांचे समर्थक संजोग वाघेरे यांनीही काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला होता. तर आता मावळपाठोपाठ खेडमधील शैलेश मोहितेंसारखा कार्यकर्ता ठाकरेंच्या गळाला लागल्याने अजित पवार गटासाठी हा धक्का मानला जात आहे.
ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शैलेश मोहिते म्हणाले, "मी राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन वर्षांपूर्वीच राजीनामा दिला आहे. आमदार दिलीप मोहिते - पाटील आमचे घरचे संबंध चांगले आहे. पण राजकारणात आमची वेगळी भूमिका आहे. आगामी काळात पक्ष संघटना वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असून पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची माझी तयारी आहे.