“साहेबांच्या कारकीर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात”अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 02:30 PM2024-11-16T14:30:47+5:302024-11-16T15:09:07+5:30
अजित पवार यांनी शरद पवार यांच्या कारकिर्दीपेक्षा आपल्या कार्यकाळात अधिक कामे झाल्याचा दावा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
बारामती : लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभा निवडणुकांमध्ये देखील बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. अशातच बारामती येथे प्रचाराच्या रणधुमाळीत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या कारकिर्दीपेक्षा आपल्या कार्यकाळात अधिक कामे झाल्याचा दावा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
“तुम्ही जर तुलना केल्यास, मी कोणाला कमी लेखत नाही. पण ‘साहेबां’च्या कारकीर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात झाली. तसं बोललो तर म्हणतील बघा, साहेबांना कमी लेखतो. त्यामुळे माझी सगळीकडूनच अडचण होते,” असं वक्तव्य अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबाबत बोलताना केलं आहे.
तालुक्यातील पानसरेवाडी येथील प्रचार दौऱ्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, “घरातील दोन उमेदवार राहिले आहेत. तुम्ही लोकसभेला गंमत केली. मी ती मान्य केली. आता गंमत करू नका, नाहीतर तुमची जंमत होईल. तालुक्यातील पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका. साहेब म्हणाले मी रिटायर होणार आहे. त्यामुळे पुढचे कोण बघणार आहे, हे तुम्हाला माहित आहे. मी टीका करायला गेलो तर तो आहे माझा पुतण्या. मी टीका करायला गेलो की घरातल्यांची उणीदुणी कशी काढायची? हा प्रश्न असतो.”
युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या पत्नी मैदानात
युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार मैदानात उतरल्या आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले आहे.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “१९९१ पासून मला खासदार-आमदार केले. पण प्रतिभा काकी कधी बाहेर आल्या नाहीत. आता त्या घरोघरी फिरत आहेत. त्यांना एवढा काय नातवाचा पुळका आला आहे, माहित नाही. मी खाताडा-पेताडा, गंजाडी असतो तर गोष्ट वेगळी होती. मी बारामतीचे वाटोळे केले असते, पार बरबाद झालो असतो, तर गोष्ट वेगळी होती. ही निवडणूक झाली की मी काकींना या विषयी विचारणार आहे,” असे पवार म्हणाले.
स्थानिक युवकांच्या तक्रारींवर आश्वासन
कर्हाटी गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर स्थानिक युवकांनी गावपुढाऱ्यांबाबत तक्रारी केल्या. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, “निवडणूक लांबल्याने संबंधितांना अधिकार नाहीत. गावपातळीवर पुढाऱ्यांनी लक्ष न दिल्यास गावाच्या महत्वाच्या कामासाठी थेट उपमुख्यमंत्र्यांच्या ‘ओएसडी’ अधिकाऱ्यांना भेटा. तिथं तुमच्या तक्रारींचे निवारण केले जाईल.”