Ajit Pawar | "कोणत्याही टुकार पोराला सोडणार नाही..." अजित पवार यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 03:45 PM2023-03-18T15:45:53+5:302023-03-18T15:53:35+5:30

आप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उद्घाटन

Ajit Pawar's warning to student criminal in baramati Inauguration of Appasaheb Pawar Udyog Bhavan | Ajit Pawar | "कोणत्याही टुकार पोराला सोडणार नाही..." अजित पवार यांचा इशारा

Ajit Pawar | "कोणत्याही टुकार पोराला सोडणार नाही..." अजित पवार यांचा इशारा

googlenewsNext

बारामती (पुणे) :बारामती शहरातील विकासकामे नीटनेटकी ठेवणे आपले काम आहे. बारामतीकरांना सुरक्षित वाटले पाहिजे. मुली आणि कुटुंबाला काही केले तर वेडेवाकडे प्रकार सहन केले जाणार नाहीत. तो कोणीही असो, टुकार पोरांना सोडणार नाही. आई-वडिलांनी ‘त्या’ पोरांना समजावून सांगा, बारामतीकरांना सुरक्षित वाटले पाहिजे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कायदा- सुव्यवस्था राखण्याबाबत कडक सूचना दिल्या.

विरोधी पक्षनेते पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि. १८) येथील आप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्हाइस चेअरमन मनोज पोतेकर, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, अविनाश लगड, रोहिदास हिरवे, पौर्णिमा तावरे, पुरुषोत्तम जगताप, संग्राम सोरटे, जय पाटील, संभाजी होळकर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, बारामती परिसरात एक लाख मुले- मुली शिक्षण घेत आहेत. शहराची अर्थव्यवस्था बदलत आहे, लोकांचे राहणीमान बदलत आहे. बारामती शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. सत्ता गेल्यानंतर विकासाचा वेग मंदावेल, असे वाटत होते. राजकीय मतांतरे असू शकतात; पण जेव्हा आम्ही सत्तेत असतो तेव्हा कामात राजकारण आणत नाही. त्यामुळे सत्ता नसताना आपली कामे अडत नसल्याचे पवार म्हणाले.

बारामतीत लघुउद्योगांना चालना देण्यासाठी आणखी उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आपणदेखील त्यासाठी प्रयत्नशील आहोत. बारामतीत स्पोर्टस हब सुरू करणार असून त्यासाठी आवश्यक निधी मंजूर झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमसमोर सुंदर शॉपिंग कॉम्प्लेक्ससह प्रशस्त नाट्यगृह, मोठे उद्यान तसेच मोठे वाचनालय उभारण्यात येणार आहे.

यावेळी बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन रणजित पवार यांनी प्रास्ताविक केले. संचालक अविनाश लगड यांनी आभार मानले.

रेल्वेमंत्रालयाची ‘ती’ रक्कम दीड टक्क्यांवर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून रेल्वेच्या बारामती शहरातील सर्व्हीस रस्त्यासाठी आवश्यक जागेचा विषय मार्गी लागला आहे. तेथील रेल्वेच्या जागेसाठी पूर्वी सहा टक्के रकमेची मागणी केली होती, ती दीड टक्क्यावर आली आहे. त्यामुळे आता पंचायत समितीपर्यंत रखडलेल्या सेवा रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, असेही अजित पवार म्हणाले.

कालव्याचे १,००० ते १,१०० क्युसेक्सने पाणी वाहणार

तीन हत्ती चौकात उंचवटा करण्याशिवाय पर्याय नव्हता. पूर्वी निरा डावा कालव्याचे पाणी ४५० क्युसेक्सने जात असे. आता उंचवट्यामुळे १,००० ते १,१०० क्युसेक्स पाणी वाहणार आहे. ते काम पूर्ण झाल्यावर जाणवेल, विकासकामे करताना सहनशीलता आवश्यक आहे. नवीन कल्पना सुचल्यास जरूर सांगा, त्यावर चर्चा करा. बारामतीत ‘बेस्ट’ करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

Web Title: Ajit Pawar's warning to student criminal in baramati Inauguration of Appasaheb Pawar Udyog Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.