भाजप नेत्याला अजितदादांच्या 'धडाकेबाज' कार्यशैलीची भुरळ; राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 04:53 PM2021-07-27T16:53:36+5:302021-07-27T17:00:54+5:30
वडगाव शेरी मतदारसंघातील एका भाजप नेते आणि माजी आमदाराने चक्क अजित पवारांच्या कामाचं कौतुक केले आहे.
विशाल दरगुडे -
पुणे : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी आणि धडाकेबाज निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या कार्यशैलीची भुरळ अनेकांना आहे. त्याला राजकीय पक्षातील नेतेमंडळी देखील अपवाद नाही. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार 'होर्डिंग वॉर' सुरु असतानाच दुसरीकडे काहीसे वेगळं आणि आश्चर्याचा धक्का देणारा प्रसंग घडला आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील एका भाजप नेते आणि माजी आमदाराने चक्क अजित पवारांच्या कामाचं कौतुक केले आहे.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी गेल्या दोन वर्षापूर्वी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला अजितदादांना मोठा धक्का दिला होता. मात्र बापूसाहेब पठारे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यपद्धतीचा कायम भुरळ पडत आले असून ते आज एकदा पुन्हा त्यांच्या तोंडून अजितदादा पवारांच्या कामाच्या पद्धतीचा निर्णयक्षमतेचा कौतुक करून कामाची भुरळ पडली.
वडगावशेरी परिसरामधील महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी वडगावशेरी राजे शिवाजी महाराज उद्यान शेजारील महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. यावेळी अधिकाऱ्यांनी माजी आमदार बापूसाहेब पठारे यांना महावितरणच्या समस्या व निधीबाबत कमतरता असून त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले. त्यावर पठारे म्हणाले, तुम्ही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये महावितरणसाठी निधीची मागणी करा. अजितदादा पालकमंत्री असल्यामुळे ते तुमच्या अडचणी समजून ते विनाविलंब निधी देतील. अशाप्रकारे पठारे यांनी अजित पवारांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
सध्या भाजपवासी असलेल्या पठारे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा..
सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादीत जाणार याच्या बातम्या सातत्याने येत असतात. याच अनुषंगाने त्यांच्याकडून अजितदादांच्या कामाचे कौतुक केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महापालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्याची शक्यता आहे.
महावितरणकडून नागरीकांना भरसाठ बिले,नोटीस न देता विदुत पुरवठा तोडणे,थकलेल्या बिलांचे हप्ते करून देणे, नविन मीटरसाठी अडचणी,भूमिगत केबलची रखडलेली कामे,रस्ता रूंदीकरणातील अडथळे ठरणारे पोल काढणे यासाठी आज सर्व पक्षीयांनी महावितरण अधिकाऱ्यांना घेरावा घातला.
याप्रसंगी शिवसेनेचे नितीन भुजबळ,राष्ट्रवादीचे नानासाहेब नलावडे यांच्यासह महावितरणचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव,दिलीप मदने,कैलास कांबळे,सचिन पुंडे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.