राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजितदादा; उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शनिवारी प्रथमच बारामतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 03:08 PM2023-08-24T15:08:54+5:302023-08-24T15:09:18+5:30

सुप्रिया सुळेंनी बारामती दौऱ्यात सहभाग घेत बारामतीत 'हम साथ साथ हैं 'चा संदेश दिला होता

Ajitdada in NCP stronghold; Baramati for the first time since becoming Deputy Chief Minister on Saturday | राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजितदादा; उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शनिवारी प्रथमच बारामतीत

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजितदादा; उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शनिवारी प्रथमच बारामतीत

googlenewsNext

बारामती : राज्यातील सत्तानाट्य घडल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि.२६) बारामतीत येत आहेत. उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल बारामतीकरांच्या वतीने अजित पवार यांचा यावेळी नागरी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी दिली.

बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे माहेरघर आहे. याच मतदारसंघातून ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली. बारामतीकरांनी पवार आणि राष्ट्रवादीमध्ये एकत्र एकदिलाचे राजकारण पाहिले आहे. मात्र, अजित पवार आणि त्यांच्या गटाने प्रथमच बाजूला जात वेगळी वाट निवडली आहे. त्यामुळे अजित पवार बारामतीकरांना काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बारामती दौरा पार पाडला. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी साहेबांची भेट घेणे टाळले. तर सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यात मात्र सहभाग घेत बारामतीत 'हम साथ साथ हैं 'चा संदेश दिला. त्यामुळे अजित पवार त्यांच्या दौऱ्यात काय बोलणार, पक्ष कार्यकर्त्यांना काय सूचना देणार, यावर बारामतीसह राष्ट्रवादीच्या राज्याच्या राजकारणातील दिशा ठरणार आहे.

अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे बारामतीची ठप्प झालेली विकासकामे सुरळीत होण्यास मदत झाली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच बारामती दौरा आहे. एरवी दर शनिवारी बारामतीत विविध विकासकामांच्या पाहणीनिमित्त येणारे अजित पवार, गेले अडीच महिने राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बारामतीला आलेच नव्हते. त्यामुळे आता प्रदीर्घ कालावधीनंतर ते बारामतीत येत आहेत. त्यांच्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी सुरू आहे.

येथील कसब्यातील कारभारी सर्कलपासून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. नंतर शारदा प्रांगणात संध्याकाळी त्यांचा नागरिक सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी दिली.

दुपारी २ वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार मोरगावमध्ये येतील. येथे मोरगावच्या गणपतीला अभिषेक घालण्यासाठी ते थांबतील. त्यानंतर सुपे, माळेगाव पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होईल. सायंकाळी शारदा प्रांगण येथे पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार होईल. या सत्कार सभेच्या नियोजनासाठी बारामती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी दिली.

Web Title: Ajitdada in NCP stronghold; Baramati for the first time since becoming Deputy Chief Minister on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.