लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : गेल्या काही दिवसांपासून खेड पंचायत समितीतील राजकारण चांगलेच तापले आहे. तीन पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. वरिष्ठ नेते कुठेही गालबोट लागू देत नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथे राजकीय कुरघोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडे राजकारण केले. अजितदादा, तुमच्या आमदाराला वेसण घाला, नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहो अथवा न राहो खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल अशा शब्दात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी असा गर्भित इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसला दिला.
संजय राऊत यांनी सभापतीपदाच्या निवडीवरून खेडमध्ये रंगलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राजगुरूनगरला भेट दिली. यावेळी त्यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात सगळीकडे राज्यकारभार सुरुळीत सुरू असताना खेड तालुक्यात कुरघोडी होत असेल तर पालकमंत्री अजित पवार यांनी विचार केला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. वरिष्ठ नेते कुठेही गालबोट लागू देत नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून खेडमध्ये मात्र, राजकीय कुरघोडीच्या वारंवार घटना घडत आहेत. दोन-तीन पक्ष असल्यामुळे भांड्याला भांडं लागते. एकमेकांची माणसं फोडून कुठेही सत्ता स्थापन करायची नाही, असा अलिखित करार असेल तर दोन पक्षांनी महिती देऊन समन्वय साधला पाहिजे.
खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडे राजकारण केले. शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी लायकीचे ते नाहीत. पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहेत. ते परंपरेला धरून नाही. अजितदादांना सांगून सुद्धा हे रेटून नेत असतील तर ह्याला माज आला असं म्हणतात. पंचायत समितीच्या सदस्यांना पैशांच्या आमिषाने पळवून नेले. हा विषय लवकरच आम्ही त्यांच्या प्रमुखांना कळवू”, असे संजय राऊत म्हणाले. यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, तनुजा घनवट, पंचायत समिती सदस्या ज्योती अरगडे आदी उपस्थित होते.
चौकट
पूर्वी आमचे युतीचे सरकार होते. दोन्हीही पक्षांनी युती धर्म पाळला. याही वेळी तीनही पक्षांची तीच भावना आहे. मात्र खेडमध्ये वेगळे घडले. शरद पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अजित पवार यांचे एकमेकांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहे. मात्र खेडची घटना आघाडी धर्मात बसत नाही.
शिवसेनेचे स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांनी पंचायत समितीची इमारत मंजूर करून कामाची सर्व पूर्तता करून पुढे तिचे काम सुरु न होऊ देण्यास आमदारांनी घाणेरडे राजकारण केले त्यांच्या मृत्यूनंतर वैर संपवावे अशी अपेक्षा होती, असे राऊत म्हणाले.