पुणे : महाराष्ट्राची आकांक्षा नित्तुरे हिने चेन्नई येथे झालेल्या १८ वर्षांखालील एमपीटीए राष्ट्रीय ज्युनिअर क्ले कोर्ट टेनिस स्पर्धेत मुलींच्या एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपद पटकावले. मुलांच्या एकेरीत हरयाणाचा चिराग दुहान विजेता ठरला.
द्वितीय मानांकित आकांक्षाने मुलींच्या एकेरीत अव्वल मानांकित रेश्मा मुरारी हिच्यावर ६-१,६-३ अशी मात केली. याआधी आकांक्षाने मुलींच्या दुहेरीत दिल्लीच्या काव्या किरवारच्या साथीत कर्नाटकच्या रेश्मा मुरारी आणि सुहिता मुरारी या भगिनींवर ६-४, ७-६ (५) अशी मात करताना मुलींच्या दुहेरीत द्वितीय मानांकित आकांक्षा-काव्या या जोडीने अव्वल मानांकित मुरारी भगिनींवर विजय साकारला. आकांक्षा सध्या वाशी येथे एनएमएसए एएसए टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक शेखर टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तसेच, अल्पेश गायकवाड आणि अरुण भोसले यांचेही ती मार्गदर्शन घेत आहे. कठोर मेहनत घेतल्यामुळेच आकांक्षाने एकही सेट न गमावता राष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी केल्याचे तिच्या प्रशिक्षकांनी म्हटले आहे. स्पर्धेतील सर्व लढती तिने एकतर्फी जिंकल्या आहेत.
फोटो - आकांक्षा नित्तुरे
फोटो आेळी - विजेतेपदाच्या करंडकासह आकांक्षा नित्तुरे.