पुणे : बडोदा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनामधील ग्रंथप्रदर्शनाला प्रकाशकांनी दिलेल्या कमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकाशकांना बडोदा येथे जाऊन पुस्तक विक्री करणे शक्य होणार नाही, अशा प्रकाशकांना अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने मदतीचा हात दिला आहे. ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनातील गाळ्यांसाठीच्या नोंदणीची मुदत २० डिसेंबर ते २० जानेवारी अशी होती. या दरम्यान केवळ ५५ ग्रंथदालनांची नोंदणी झाली होती. कमी प्रतिसादामुळे आयोजकांनी नोंदणी सुरू ठेवल्याने आतापर्यंत ९५ गाळ्यांची नोंदणी झाली आहे. दरवर्षीच्या संमेलनाचा विचार करता ही संख्या कमी असल्याने आणखी गाळ्यांची नोंदणी होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने प्रकाशकांना सहकार्य करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला.प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे म्हणाले, की बडोदा येथे जाऊन पुस्तक विक्री करण्याचा खर्च शक्य नसलेल्या प्रकाशक संस्थांसाठी प्रायोजकत्व दिले जाईल. त्यामुळे त्यांना फारसा खर्च करावा लागणार नाही. सुसज्ज ग्रंथदालन असल्याशिवाय संमेलनात वातावरण निर्मिती होत नाही. दरवर्षीच्या संमेलनात किमान तीनशे गाळे असतात तर पिंपरीच्या संमेलनात चारशे गाळे होते. यंदाचे संमेलन दुसºया राज्यात होत असल्याने प्रकाशकांची कमी असलेली संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ज्या प्रकाशकांनी गाळा नोंदणी केली आहे, अशांना आमच्यातर्फे गाळा दिला जाणार नाही. एका प्रकाशकाला एकच गाळा दिला जाईल. सभासद नसलेल्या प्रकाशकाला आधी सभासद करून घेतले जाईल, त्यानंतर संधी दिली जाईल. ‘आयोजकांनी परवानगी दिली तर आम्ही आणखी ४० गाळ्यांची नोंदणी करण्यास इच्छुक आहोत. यामध्ये गरजू आणि लहान प्रकाशक संस्थांना मदत दिली जाईल. ‘संमेलनाच्या उद्घाटनापर्यंत गाळ्यांची नोंदणी खुली ठेवण्यात येणार आहे. जशी जागा असेल तसे गाळे उपलब्ध करून दिले जातील,’ असे सांगण्यात आले.एका गाळ्यासाठी तीन दिवसांचे चार हजार रुपये भाडे आकारण्यात आले आहे. प्रकाशक किंवा विक्रेत्यांना जास्तीत जास्त तीन गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एक गाळा घेतला, तरी प्रवासखर्च, पुस्तकांच्या वाहतुकीचा खर्च, संमेलनादरम्यान होणारा खर्च किमान २५ हजार रुपये होणार असल्याचे गणित प्रकाशकांनी मांडले आहे.
बडोदा साहित्य संमेलनात छोट्या प्रकाशकांना अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:18 PM
बडोदा येथे होणाऱ्या साहित्य संमेलनामधील ग्रंथप्रदर्शनाला प्रकाशकांनी दिलेल्या कमी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकाशकांना बडोदा येथे जाऊन पुस्तक विक्री करणे शक्य होणार नाही, अशा प्रकाशकांना अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने मदतीचा हात दिला आहे.
ठळक मुद्देगाळ्यांसाठीच्या नोंदणीची मुदत होती २० डिसेंबर ते २० जानेवारी बडोदा येथे जाऊन पुस्तक विक्रीचा खर्च शक्य नसलेल्या प्रकाशक संस्थांसाठी प्रायोजकत्व : बर्वे