पुणे : अखिल मंडई मंडळाचा १२८ वा गणेशोत्सव मागील वर्षाप्रमाणे यंदाही साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिरातच शारदा गजानन विराजमान होणार आहेत. शुक्रवारी, १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि त्यांच्या पत्नी मीना भोंडवे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होईल, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली. ऑनलाइन पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजल्यापासून प्रात:पूजा, आरती, गणेशयाग, सायंपूजा आणि संध्याकाळी ७.३० वाजता महाआरती होणार आहे. उत्सवकाळात २४ तास ऑनलाइन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंडळाच्या ँ३३स्र२://ं‘ँ्र’ेंल्लं्रिेंल्लंि’.ङ्म१ॅ/ या वेबसाईटवरून शारदा गजाननाचे दर्शन घेता येणार आहे. भाविकांनी ऑनलाइन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
--------------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे अधिक काळजी
कोरोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी, अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मंडळाच्या वतीने लसीकरण मोहीम देखील राबविण्यात येत आहे. यासोबतच कमीत कमी गणेशभक्त मंदिरात असतील. दर २ तासांनी फॉगिंग मशीनच्या सहाय्याने पूर्ण मंदिर सॅनिटाईज केले जाणार आहे. ऑक्सिमीटर, आणि थर्मामीटरच्या सहाय्याने प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे. मंडळात येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्क बंधनकारक आहे.
फोटो - शारदा गजानन