- राहूल पांगरे
खेड शिवापूर (पुणे) : आजही धर्मांच्या भिंतींपलीकडून एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे एकमेकांच्या धार्मिक अधिष्ठानाप्रती आस्था बाळगणारे अनेक लोक ठिकठिकाणी आपणाला आढळतात. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे खेड शिवापूर परिसर. अजान आणि भजन दोन्ही समुदायातील नागरिक तितक्याच श्रद्धेने करतात. हा भक्तिमय संगमच गावाची वेगळी ओळख आहे.
आज ईद व अक्षय तृतीया हे सण हिंदू व मुस्लीम या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे सण. हे सण दोन्ही समाजात वेगवेगळ्या रूढी, परंपरा पाळत साजरे केले जातात. खेड शिवापूर येथे दोन्ही समाजांचे लोक अत्यंत प्रेम आणि श्रद्धेने एकमेकांच्या रूढी- परंपरांचा आदर करत गुण्यागोविंदाने हे दोन्ही सण एकत्रितपणे साजरे करतात.
इथे जितक्या भक्तिभावाने अजान होते तितक्याच श्रद्धेने भजनही होते. हिंदू धर्माचे लोक दरवेश बाबांची पालखी अत्यंत श्रद्धापूर्वक गावभर मिरवत त्यांच्या उरुसात सहभागी होतात. गावात होणारी पांडुरंगाची काकड आरती व अखंड हरिनाम सप्ताहातही मुस्लीम समाजाचे नागरिक श्रद्धेने सहभागी होतात.
खेड शिवापूर गावात जुन्या काळापासून हिंदू आणि मुस्लीम समाजाचे लोक एकमेकांशी कौटुंबिक संबंध जपून आहेत. एकमेकांच्या सुखदु:खात ते कायम सहभागी होत असतात. हिंदू सणांच्या दिवशी गावातील मुस्लीम समाजाच्या घरांमध्येही पुरणपोळी बनवली जाते. दर्ग्याच्या नैवेद्यासाठी हिंदू घरांमधून मलिदा येतो.
-अमोल कोंडे (सरपंच, खेड शिवापूर)
खेड शिवापूर येथील कमरअली दरवेश बाबांवर मुस्लिमांसह, हिंदू ग्रामस्थांचेही प्रेम आणि श्रद्धा आहे. दोन्ही समुदायांचे एकमेकांशी असलेले कौटुंबिक संबंध हेच आमच्या एकोप्याचे गमक आहे.
-फिरोज मुजावर (विश्वस्त, कमरअली दरवेश दर्गा)