आळंदी : भामा आसखेड धरणातून पुण्याला नेण्यात येणाऱ्या पाईपलाईनला कुरुळी येथे टॅपिंगची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आळंदीकरांना तसेच भाविक - भक्तांना शुद्ध पाणी पुरवठा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दोन ते तीन दिवसात टॅपिंगचे काम पूर्ण करुन पाणीपुरवठा सुरू केला जाईल, अशी माहिती नगराध्यक्षा वैजंयता उमरगेकर यांनी दिली.
मागील अनेक दिवसांपासून आळंदी शहरातील पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. इंद्रायणी नदी दूषित झाल्याने आळंदीच्या जलशुद्धीकरण केंद्रावर प्रचंड ताण येऊन बिघाडही होत आहे. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर भामा आसखेड धरणातील पुणे मनपाच्या कुरुळी येथील पाईपलाईनला टॅपिंग करून आळंदी शहराला पाणी देण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर नगरपरिषद व पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
पुणे येथे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याकडे जाणाऱ्या पाईपलाईनला कुरुळी येथे टॅपिंगची परवानगी देण्यात येत असल्याचे पत्र नगराध्यक्षा उमरगेकर यांच्याकडे दिले. याप्रसंगी परवानगी पत्र स्वीकारण्यासाठी माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, संजय घुंडरे, पांडुरंगशेठ ठाकूर आदी उपस्थित होते. या प्रकियेला तसेच आळंदीला शुद्ध पाणी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री व तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीष बापट, आमदार दिलीप मोहिते - पाटील आदींचे विशेष सहकार्य लाभल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.