लोकमत न्यूज नेटवर्कशिरगाव : महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आळंदी ते आझाद मैदान मुंबई सायकल अनुदान वारी काढण्यात आली आहे. आळंदी येथून श्री संत ंज्ञानेश्वरमहाराजांचे आशीर्वाद घेऊन वारीचे प्रस्थान झाले. शनिवारी सायंकाळी शिरगाव येथे श्री साईबाबा संस्थानाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, सचिव सपना लालचंदानी, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांनी स्वागत करीत आंदोलनास पाठिंबा दिला. बुधवार, दि. २६ रोजी आझाद मैदान येथे सायकल अनुदान वारीदाखल होऊन याचे रूपांतर महामोर्चात होणार आहे. येथे राज्यभरातून विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिली. वारीतून शासनाचे लक्ष शिक्षकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येणार असून, येत्या अधिवेशनात शिक्षकांचे व विनाअनुदानित शाळांचे प्रश्न सोडविण्यास भाग पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सायकल वारीत खंडेराव जगदाळे, प्रकाश पाटील, सुनील कल्याणी, वैद्यनाथ चाटे, गजानन काटकर, अरुण मराठे, पुंडलिक रहाटे, शशिकांत जाधव, बद्रिनारायण पाटील, हनुमान सुरनर, रामभाऊ घुगे, किरण धादवड आदीसह जवळपास पन्नासच्या वर शिक्षक सहभागी झाले आहेत. तसेच प्रवासात आणखी शिक्षक सहभागी होणार आहेत.आश्वासन देऊनही १ व २ जुलैच्या शाळा अनुदानापासून वंचित राहिल्या आहेत. अनेक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा घोषित होण्यासाठी प्रलंबित ठेवल्या आहेत. २० टक्के अनुदान घेतलेल्या शाळांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान देण्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. औरंगाबाद येथे शिक्षकांवर झालेला पोलिसांचा लाठीचार्ज व त्यानंतर ५९ शिक्षकांवर उर्वरित सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. २० टक्के अनुदानपात्र शाळेतील अतिरिक्त शिक्षकांना सेवेत सामावून घेण्यात यावे. ५/७/२०१६ रोजी दिलेल्या आश्वासनाची येत्या पावसाळी अधिवेशनात पूर्तता व्हावी याकरिता मागण्यांचे निवेदन घेऊन महामोर्चाचे आयोजन केले आहे.
शिक्षकांची आळंदी-मुंबई अनुदान वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 2:46 AM