आळंदी (पुणे) : तीर्थक्षेत्र आळंदीत वातावरणातील बदलामुळे उद्भवलेली डोळे येण्याची साथ आटोक्यात येऊ लागली आहे. मागील तीन दिवसांत आकडेवारी शहरातील डोळ्यांच्या साथीची रुग्णसंख्या घटल्याचे आकडेवारीत स्पष्ट होत आहे. शुक्रवारी (दि.२८) सुमारे ३५ हजार १२० नागरिकांचा सर्व्हे करण्यात आला असून, यामध्ये फक्त १६२ जणांना डोळ्याचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील आठ दिवसांच्या तुलनेत चालू आठवड्यात रुग्णसंख्या घटत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
मागील दहा दिवसांत सुमारे सात हजारांहून अधिक शाळकरी मुलांना या साथीच्या आजाराला सामोरे जावे लागले आहे. सद्यस्थितीत हा आकडा ८ हजार १५ पर्यंत पोहोचला आहे. मात्र, उपचारानंतर ६ हजार ५०२ जण या डोळ्याच्या आजारातून बरे झाले आहेत. आळंदीत राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत मुलांची, तसेच नागरिकांची तपासणी केली जात आहे. डोळ्यांची लागण झालेल्या रुग्णांना तत्काळ औषधे देण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.इंदिरा पारखे व वैद्यकीय अधीक्षक डॉ.उर्मिला शिंदे यांनी दिली.