आळंदी : चिंबळी परिसरातील रेड्डी कस्टम प्रा. लि. कंपनीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या नेपाळी टोळीला व त्यांचे दोन अल्पवयीन साथीदारांना आळंदीपोलिसांनी पकडले आहे. सोमवारी (दि.८) चिंबळी हद्दीत पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र यातील टोळीचा प्रमुख अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे हातात कोयता व दरोड्याचे इतर साहित्य घेऊन सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास चिंबळी परीसरातील रेड्डी कस्टम प्रा. लि. कंपनीचे पत्र्याची सुरक्षा भिंत उचकटण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी आवाजाने आसपाच्या नागरिकांनी त्यांना हटकले व तेथून हुसकावून लावले. आरोपींनी तेथून पळ काढला व पुढे त्यांनी दुसऱ्या कंपनीमध्ये चोरी करण्याच प्रयत्न सुरु केला. या दरम्यान नागरिकांनी आळंदी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी जाताच त्यांनी आरोपींना रंगेहाथ पकडले.
नयसिंग लालसिंग ढोली (वय ४८), निट बहमसिंग ढमाई (वय ३२), विशाल शेटे ढोली (वय १८), दिनेश नयसिंग ढोली (वय १९) यांना पोलिसांनी अटक केली असून दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेतले आहे. हे सर्व आरोपी मुळचे नेपाळचे असून सध्या लोणी काळभोर येथे राहण्यास आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून पोलिसांनी कोयता, दोन हेक्सा ब्लेड, मिरचीपूड, लोखंडी पान्हा, लोखंडी पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, कटर ब्लेड, दोन लॅपटॉप, तांब्याचे केबल असा एकूण चार ते पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान मंगळवारी आरोपींना न्यायालयात हजर केला असता येत्या शनिवारपर्यंत (दि.१३) पोलीस कस्टडीचे आदेश देण्यात आले आहेत. परिसरात रेकी करून कंपनीमधील तांब्याची केबल चोरून नेणे हा त्यांचा उद्देश होता अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक बी एम जोंधळे यांनी दिली.