आळंदी : संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी दिन सोहळा, अर्थात आळंदी यात्रा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी आलेल्या भाविकांना अलंकापुरीत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. देवस्थानाकडून मंदिर परिसरातही भाविकांना स्वच्छ पाणी पुरविण्यात येईल.अलंकापुरीत कार्तिकी सोहळ्याला लाखो भाविक येतात. शहरातील सर्वच उपलब्ध पाणीस्रोतांच्या ठिकाणी भाविकभक्तांची मोठी गर्दी होते. अशा वेळी जास्त पाण्याची आवशकता भासत असल्याने उपलब्ध पाणी अशुद्ध होण्याचा मोठा धोका निर्माण होत असतो. परिणामी, वारकºयांना मिळेल त्या पाण्याचा आसरा घेऊन वेळ काढावी लागते. परंतु, कार्तिकीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर उपाय म्हणून २४ तास पंपिंग चालू ठेवून झोन पद्धतीने दर २ तासांनी शहरात पुरेशा प्रमाणात पाणी वितरित केले जाणार आहे.तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून नवीन पाणीपुरवठा केंद्राचे काम करण्यात आले आहे. तर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. पाणीपुरवठा केंद्राकडील यंत्रसामग्रीची अपूर्ण कामे युद्धपातळीवर सुरू असून, नगरपालिका हद्दीतील पाण्याची गळती थांबविण्याचे काम प्राधान्याने करण्यात येत आहे.संजीवन समाधी सोहळ्यादरम्यान भाविकांच्या सोयीसाठी १० टँकरची व्यवस्था करण्यात आली असून, शहरातील प्रमुख ठिकाणी हे शुद्ध पाण्याचे टँकर तैनात करण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच भागात विश्रांतीसाठी असलेल्या वारकºयांना या पाण्याचा उपयोग करता येईल. दूर अंतरावरून आलेल्या भाविकांना स्वयंपाक करताना नेहमीच स्वच्छ पाण्याची अडचण निर्माण होत असते.अलंकापुरीत शनिवार (दि. ११) पासून ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर, पाणीपुरवठा केंद्रातील सर्व पंप २४ तास चालू ठेवून ४० ते ४५ लाख लिटर पाणीपुरवठा शहराला करावा लागतो. त्यामुळे नादुरुस्तहोण्याची शक्यता असल्याने दक्षता घेण्यात येईल.
आळंदीत वारक-यांना मिळणार शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 5:02 AM