पुणे : स्वस्तात लग्न करायचेय? चला आळंदीला! पण, आता येथील लग्नही महागणार आहे. आळंदी नगर परिषदेकडून येथील मंगल कार्यालयांना सेवाशुल्कापोटी आता एक हजार रुपये आकारले जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या बजेटमध्ये ही तरतूद केली असून, १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आळंदी परिसरात सुमारे ३५० मंगल कार्यालये आहेत. एका दिवसात कधी दोन, तर कधी तीनही लग्ने तेथे लावली जातात. अडीच हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत पैसे घेऊन येथे लग्न लावले जाते. अलीकडे तर रस्त्यावरही लग्न लागत आहे. स्वस्तात लग्न होते म्हणून येथे वर्षानुवर्षे लग्नांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्याचा परिणाम शहरावर होत आहे. येथील कोणत्याही मंगल कार्यालयाला पार्किंग नाही. त्यामुळे लग्नसराईत आळंदीतील वाहतूक विस्कळीत होते. नागरिकांना रस्त्यावरून चालणेही अवघड होते. तसेच, या मंगल कार्यालयांत कसल्याही सोयीसुविधा नाहीत. कधीही या, लग्न लावून जा! मुहूर्त नाही, विधी नाही; लग्न मात्र लावले जाते. लग्न लावणे हा एक मोठा धंदाच झाला आहे. नगरपालिकेकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही व या बेकायदेशीर लग्नांना आवर घालण्यासाठी नगरपालिकेने हे सेवाशुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सेवाशुल्क आकारणीच्या ठरावाला आळंदीतील मंगल कार्यालय चालक-मालकांनी मात्र हरकत घेतली असून, तसे निवेदन त्यांनी नगर परिषदेला दिले आहे.
आळंदीत लग्न महागले!
By admin | Published: April 03, 2015 3:18 AM