आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी अलंकापुरीत आलेल्या सर्व वारकºयांचे दर्शन सुकर व्हावे, म्हणून इंद्रायणीकाठच्या प्रशस्त जागेत तात्पुरती दर्शनबारी उभारण्यात आली आहे. यामध्ये भाविकांना शुद्ध पाणी, चहा, खिचडीचे मोफत वाटप केले जाणार आहे. तत्पूर्वी शनिवारी (दि. ११) सकाळी सातला महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सोहळ्यास सुरुवात होणार आहे. मुख्य पहाटपूजा मंगळवारी (दि. १४) माऊलींचा संजीवन सोहळा १६ नोव्हेंबरला होणार आहे. अलंकापुरी या दिमाखदार सोहळ्यासाठी सज्ज झाली असून नगरपालिका, देवस्थान, पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.संत ज्ञानेश्वरमहाराजांचा यंदा ७२१ वा संजीवन समाधी दिन सोहळा आहे. यानिमित्त ‘श्रीं’च्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल होतात. परिणामी भाविकांना दर्शनासाठी आठ ते दहा तासांची प्रतीक्षा करावी लागते. या पार्श्वभूमीवर नदीपलीकडच्या प्रशस्त जागेत दर्शनबारी उभारण्यात आली आहे. यामुळे किमान १५ हजार वारकरी एकावेळी दर्शनबारीत एकत्र येण्यास मदत होणार आहे. याशिवाय मंदिराच्या पश्चिम बाजूस दोनमजली दर्शनबारी कायमस्वरूपी असून त्या ठिकाणी चार हजार भाविकांची सोय आहे. घातपाताची शक्यता आणि चेंगराचेंगरीसारखी घटना होऊ नये, यासाठी देऊळवाड्यात दर्शनासाठी आलेल्या वारकºयांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, धातुशोधक यंत्रणा तपासणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे.आजपासून (दि. ११) भाविकांना आजोळघरच्या दर्शनबारीतून आणि पानदरवाजातून दर्शनासाठी देऊळवाड्यात प्रवेश दिला जाणार आहे. महाद्वारातून दर्शनानंतर बाहेर पडण्याचा मार्ग राहील. याचबरोबर हनुमान दरवाजा आणि गणेश दरवाजा बंद ठेवण्यात येणार आहे. निमंत्रित पासधारकांना हरिहरेंद्रमठ स्वामी मंदिराजवळील दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना हनुमान दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे.भाविकांच्या सुरक्षेसाठी यंदा मंदिर आणि मंदिर परिसरात सुमारे १०५ कॅमेरे लावण्यात आले आहेत. याशिवाय घातपाताची शक्यता लक्षात घेता भाविकांना मंदिरात येताना पिशव्या, चपला आणण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.संशयास्पद वस्तूंची तपासणी करण्यासाठी देवस्थानने तीन धातूशोधक यंत्रणा आणि पोलिसांच्या वतीने दोन धातुशोधक यंत्रणा मंदिरात बसविली जाणार आहे. याशिवाय देवस्थानचे स्वत:चे सतरा सुरक्षारक्षक आणि आळंदी पोलिसांच्या वतीने बंदोबस्त दोन सत्रात महाद्वार, पानदरवाजा, दर्शनबारी, पंखामंडप, वीणामंडप, हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. शिवाय महिला पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त आहे.देवस्थानच्या वतीने मंदिर परिसरात सांप्रदायिक पुस्तकांची विक्री स्टॉल, देणगी पावत्या यासाठी कक्ष उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सवलतीच्या दरातील केवळ पन्नास रुपयांतील ज्ञानेश्वरीची पारायण प्रत सुमारे तीन हजार छापून तयार आहे. दहा रुपयांत दोन याप्रमाणे लाडू प्रसादही सुमारे पंधराशे क्विंटल बनविण्याचे काम सुरू आहे. मंदिर स्वच्छतेसाठी स्वकामसेवा, विश्वसामाजिक सेवा मंडळ, बीव्हीजीच्या स्वयंसेवकांची नेमणूक तीन सत्रांत करण्यात आली आहे.दर्शनबारीतच तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. दर्शनबारीतील वारकºयांना मोफत खिचडीवाटप, चहा, पाणीवाटपाची सोय आहे. विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत हे वाटप केले जाणार आहे.
संजीवन सोहळ्यासाठी अलंकापुरी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 2:42 AM