पुणे : विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोल आणि डीजेसंदर्भात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या बाबत प्रत्येक मंडळांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली जाईल. गणेश उत्सव उत्साहात मात्र नियमात साजरा व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असेल. विसर्जन मिरवणुकीत एका मंडळाच्या समोर किती ढोल पथके असणार याचा निर्णय पुढच्या बैठकीत घेण्यात येईल, अशी माहिती पोलिसआयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. काही गणेश मंडळांनी गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद (ड्राय डे) ठेवण्यात यावा, अशी मागणी केली त्यावरही याबाबत जनभावना काय आहे याचा विचार करून निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. आगामी गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते.
या बैठकीला शहरातील ३०० मंडळांचे ६०० प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, प्रवीण पाटील आणि मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत त्यांच्या सूचना मांडल्या. यावेळी बोलताना अमितेश कुमार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये घोषणा केली होती. त्याप्रमाणे गेल्या वर्षी ज्या गणेश मंडळांनी परवानगी घेतली आहे त्यांना ५ वर्ष परवानगी घेण्याची गरज नाही. तसेच नवीन मंडळांसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात येणार आहे. अनेक गणेश मंडळे हे वर्गणी न घेता उत्सव मंडळात स्टॉलला परवानगी देताना, या वेळी वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. तसेच कमानी उभारताना देखील वाहतुकीचा विचार करून नियमात बसेल अशा पद्धतीने उभाराव्यात. या संदर्भात स्थानिक पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या वेळेसंदर्भात प्रत्येक झोननुसार बैठका घेतल्या जाणार आहेत. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार. कार्यकर्त्यांनी ठरवले तर सगळे काही वेळेवर होईल. मागच्या काही दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले, पण पावसामुळे पुन्हा खड्डे पडले. गणेशोत्सवादरम्यान मात्र पोलिस आणि महापालिकेकडून पुन्हा खड्डे बुजवले जातील.
पुणे पोलिसांनी ड्रग्सविरोधात मोहीम उघडली असून, गणेश मंडळांनी त्याला बळ द्यावे. याचप्रमाणे मंडळांनी अवैध धंद्यांसंदर्भात माहिती दिल्यास त्यांच्यावर पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येईल. शहरातील प्रमुख मंडळांना लवकरच भेट देऊन त्या ठिकाणची पाहणी करणार आहे. याबरोबर विसर्जन मिरवणूक मार्गाची देखील पाहणी करण्यात करणार येणार असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.