पुणे: दारूच्या नशेत रिक्षाचालकाने पुण्यातील सिहंगड रस्त्यावरील राजाराम पुलावरून उडी मारल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमाराला घडली. दरम्यान, या घटनेत त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला.
रिक्षाचालकाने दारूच्या नशेत राजाराम पुलावरून उडी मारली. यावेळी उपस्थित तरुणांनी धोकादायक परिस्थितीत प्रसंगावधान राखून पुलाखाली जाऊन त्या रिक्षाचालकाला बाहेर काढले. यावेळी पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत अग्निशामक दलाची वाट पाहात होते. रिक्षाचालक रवींद्र विनोबा उभे( वय 43 औदुंबर कॉलनी कर्वेनगर) असे त्याचे नाव आहे.
पुलावरून उडी मारल्यानंतर त्याला बघण्यासाठी पुलावर लोकांची गर्दी झाली होती. नशेमध्ये त्याने पुलावरून उडी मारली पण नदीत गाळ होता त्यामुळे त्याला जास्त लागले नाही. कर्वेनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, पण ते त्याला काढायला खाली उतरले नाहीत. अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याला वाचविण्यासाठी शुभम येडे, समाधान वीर, ओमप्रकाश नामदेव आटोळे, सुशांत आंबेकर, अमेय डाळिंबकर या तरुणांनी नदी पात्रात उतरुन सुखरूप बाहेर काढले.
बाहेर काढल्यानंतर रिक्षाचालक हा हसत होता आणि सगळ्यांशी बोलत होता. आज महात्मा गांधी जयंतीदिनी शहीद व्हायचे होते म्हणून उडी मारली असल्याचे तो सांगत होता.