प्रियांका लोंढे, पुणेशाळेच्या मैदानाभोवतीची सीमाभिंत मोडकळीस आलेली... टोळक्यांच्या भीतीने सुरक्षारक्षक गायब... त्यामुळे कर्वेनगर येथील महापालिकेच्या सम्राट अशोक विद्यामंदिर या शाळेच्या परिसरात ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी परिस्थिती आहे. रात्रीच्या वेळेत शाळा आवार दारुड्यांचा अड्डा बनला आहे. अनेकदा सीमाभिंत उभारण्यासाठी निधीची मागणी करूनही शिक्षण मंडळ प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे.महापालिकेची सम्राट विद्यामंदिर ही जुना शाळा आहे. कर्वेनगर परिसरातील सुमारे २००० विद्यार्थी शाळेत येतात. मात्र, गेल्या काही वर्षांत शाळेच्या सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. शाळेला सीमाभिंत नसल्याने शाळेच्या वेळेत बाहेरून आलेली मुले मैदानावर क्रिकेट खेळतात. त्या वेळी आरडाओरडा होतो. शिवीगाळ केली जाते. अनेकदा बाहेरच्या मुलांना समज देऊन ते ऐकत नाहीत, असे शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता गायकवाड यांनी सांगितले. शाळेच्या सुरक्षारक्षकांवर अरेरावी केली जाते. त्यामुळे रक्षक घाबरून थांबत नाहीत. त्यामुळे शाळा सुटण्यावेळीही बाहेरची टारगट मुले विद्यार्थिनींची छेडछाड करतात. रात्रीच्या वेळेत शाळेच्या आवारात दारूच्या पार्ट्या चालतात. सकाळी शाळेत दारूच्या बाटल्यांच्या काचा पडलेल्या असतात. तसेच, कचराही टाकलेला आढळतो. सीमाभिंत नसल्याने रोज गुपचूप साफसफाई करण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय राहत नाही. प्रशासनाकडे त्याविषयी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, निधी नसल्याने सीमाभिंत बांधता येत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली जात आहे, असे एका शिक्षकाने ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्याविषयी शिक्षण मंडळाचे शिक्षणप्रमुख शिवाजी दौंडकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कर्वेनगरच्या शाळेत मद्यपींचा अड्डा
By admin | Published: April 06, 2015 5:38 AM