यवत : लग्न झाल्यापासून दारू पिऊन त्रास देणाऱ्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळलेल्या एका महिलेने शुक्रवारी (दि.१) रात्री चुलीतील जळणारे लाकूड त्याच्या डोक्यात मारून हत्या केली. ही घटना सहजपूर (ता.दौंड) येथे घडली. लक्ष्मण बाबूराव थोरात असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी मयताचा मुलगा केशव लक्ष्मण थोरात याने फिर्याद दिली. मृताची पत्नी कमल लक्ष्मण थोरात हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला कमलचा नवरा लक्ष्मण हा गेल्या अनेक वर्षांपासून तिच्यावर संशय घेत असे; तसेच दारू पिऊन घरी येऊन तिला मारहाण करीत असे. सततच्या या त्रासाला ती कंटाळली होती. त्यांच्या मुलींचे लग्न झाले. मुलगा मोठा झाला तरी जाच मात्र कमी होत नव्हता.शुक्रवार (दि.१) रोजी लक्ष्मण थोरात हा त्याच्या भावकीमधील लग्नाला गेला होता. त्यानंतर लग्नाची वरात असल्याने तो वरातीमध्ये प्रचंड दारू पिऊन घरी आला. नशेत त्याने बायकोला मारहाण केली. तसेच, जबरदस्तीने शरीरसंबंधाची मागणी केली. याला तिने विरोध केला. यानंतर त्याने आपण दोघेही जळून मरू, असे सांगत अंगावर घरातील रॉकेल ओतून घेतले. घरातील गोधडी पेटविली. कमलने याला विरोध करण्यासाठी त्याच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकली. तरीही तो अंगावर येत असल्याने घरात चुलीमधील असलेल्या लाकडाने डोक्यात मारले. डोक्यात लाकूड लागल्याने गंभीर जखमी झाल्याने लक्ष्मण थोरातचा जागेवर मृत्यू झाला. या घटनेतील दुर्दैव म्हणजे घटनास्थळी पोलीस गेल्यानंतर त्यांना मयताच्या भावकीमधील कोणीही सहकार्य केले नाही. मृताची बॉडी शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर भावकीमधील काहींनी तेथे येऊन संबंधित महिला व मुलावरदेखील खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, अशी माहिती यवत पोलिसांनी दिली.यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत फिर्यादी मुलगा केशव थोरात याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुशांत किनगे, पोलीस नाईक दीपक पालखे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश झरेकर, संपत खबाल, हरिष शितोळे व सहकारी यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)
जाच सहन न झाल्याने मद्यपी पतीचा खून
By admin | Published: May 03, 2015 5:53 AM