लोकमत न्यूज नेटवर्क
उरुळी कांचन : मद्यपी मुलाने आजारी वडिलांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा गळा आवळून, तर नंतर ब्लेडने गळ्यावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन येथे गुरुवारी (दि.१०) उघडकीस आली. घटनेनंतर घरच्यांना खोलीत डांबून ठेवत याबाबत कुणाला सांगितल्यास मारण्याची धमकी दिली. दोन दिवसांनंतर आरोपीची पत्नी घरी आल्यावर, या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नईम रहीम शेख (वय ३८, रा. संस्कृतीनगर, तुपेवस्ती, उरुळी कांचन) असे आरोपीचे नाव आहे. तर रहीम गुलाब शेख (वय ६७) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार : रहीम गुलाब शेख हे त्यांची मुलगी शेहनाज रशीदखान जमादार यांच्याकडे राहण्यास होते. त्यांचा मुलगा नईम रहीम शेख याचे व त्याच्या पत्नीचे भांडण झाल्यामुळे पत्नी माहेरी गेली होती. त्यामुळे तो वडिलांसह बहिणीकडे राहत होता. त्याचा मोटरसायकल दुरुस्तीचा व्यवसाय होता. रहीम शेख हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. यामुळे एकाच ठिकाणी ते पडून होते. त्याने त्यांची सोमवारी (दि. ७) कोरोना चाचणी केली. यानंतर मंगळवारी (दि. ८) मुलाचे आणि त्यांचे किरकोळ भांडण झाले. यानंतर ‘मै तुम्हे आझाद करदुंगा’ म्हणत सुरुवातीला त्याने त्यांचा गळा आवळला. त्यानंतर ब्लेडच्या साह्याने गळा कापून त्यांचा खून केला. घटनेनंतर त्याने त्याची बहीण शेहनाज जमादारला याबाबत कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देत तिला व तिच्या दोन मुलांना एका खोलीत दोन दिवस बंद ठेवले. दोन दिवसांनतर नईमची पत्नी घरी आल्यावर या घटनेचा उलगडा झाला. तिने ही घटना पोलिसांना सांगितली. यानंतर पोलिसांनी नईमला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार हे करीत आहेत.
फोटो ...रहीम गुलाब शेख