पुणे : जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचेवर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ आळेफाटा व परिसरात दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. निषेध सभेनंतर व्यवहार पुन्हा सुरळीत सुरु झाले. आळेफाटा चौकात नागरिक व व्यापारी यांनी निषेध सभेचे आयोजन केले होते. यानिमित्ताने परिसरात कडकडीत बंदही पाळण्यात आला.
आळेफाटा पोलिसांनी एक वाहतूक करणारी जीप पकडून हा गहू रेशनिंगचा असल्याचे संशयावरून पुरवठा अधिकारी यांचे फियार्दीवरून गुन्हा दाखल केला. याबाबत आमदार शरद सोनवणे यांनी पोलिस ठाण्यात येत हा गहू एका महिलेने दान म्हणून मागून विकलेला असल्याचे सांगत हवी तर याची चौकशी करा चुकीचा प्रकार असेल तर गुन्हा दाखल करा व नसेल तर अन्याय करू नका असे सांगितले. मात्र यानंतर त्यांचेवर याबाबत सरकारी कामात अडथळा व अर्वाच्य भाषा प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याच्या निषेधार्थ तालुक्यातील नागरिक व व्यावसायिक यांनी आळेफाटा चौकात निषेध सभेचे आयोजन केले होते. या सभेत विघ्नहरचे माजी उपाध्यक्ष भीमाजी गडगे यांनी बोलताना सांगितले की अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये आमदार शरद सोनवणे यांना अडकवण चुकीचे असून अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेत समन्वयाची भुमिका असणे गरजेचे आहे. माजी पंचायत समिती सदस्य नेताजी डोके यांनीही याबाबत तीव्र भावना व्यक्त करत आळेफाटा पोलिस ठाण्यात आमदारांवर चुकीचा गुन्हा दाखल केला असून त्वरित हा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी केली. तर पकडलेला गहू हा दान म्हणून मागितलेला असल्याचे राजुरी मुसलमान जमात सदर झकीरभाई पटेल यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.