पुणे : स्थानिक रहिवासी आणि मोठ्या प्रमाणावर नवीन स्थायिक मतदारांचा भरणा असलेल्या वडगाव बुद्रुक-हिंगणे खुर्द या प्रभागात सर्वच पक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरस दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपासह काँग्रेस, मनसे व शिवसेनेची लढत रंगतदार होणार आहे. भौगोलिकदृष्ट्या मोठा विस्तार तसेच सुमारे ७० हजारांहून अधिक लोकसंख्येच्या या प्रभागातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. या मतदारसंघामध्ये सुमारे ३० टक्के भाग हा वस्तीचा असून, ७० टक्के सोसायट्यांचा भाग आहे. सुशिक्षित, नोकरदार वर्गाची संख्या जास्त असलेल्या या भागात सर्व पक्षांनी स्थानिक उमेदवारांना पसंती दिली आहे. राष्ट्रवादी व भाजपा या दोन पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असली तरी काँग्रेस, शिवसेना व मनसेनेही प्रचारात आघाडी घेत आव्हान उभे केले आहे. या प्रभागात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. सर्व पक्षांची ताकद या प्रभागात दिसून येत असल्याने मतदारांमध्येही उत्सुकता जाणवत आहे. अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या, सातत्याने होणारी वाहतूक कोंडी यामुळे सिंहगड रस्ता नेहमीच चर्चेत असतो. या रस्त्यावरील कोंडी फोडण्यात यश मिळालेले नाही. तसेच, पर्यायी रस्त्याचाही प्रश्न मार्गी लागलेला नाही. दोन विद्यमान आणि तीन माजी नगरसेवकांनी प्रभागात रंगत आणली आहे. भाजपाकडून प्रसन्न जगताप, ज्योती गोसावी, मंजूषा नागपुरे, श्रीकांत जगताप, राष्ट्रवादीकडून बाळासाहेब कापरे, जयश्री जगताप, माधुरी कडू, शैलेश चरवड, काँग्रेसकडून राजू चव्हाण, मंगल निवंगुणे, अनुराधा साळुंके, चैतन्य पुरंदरे, शिवसेनेकडून संतोष गोपाळ, पल्लवी पासलकर, पौर्णिमा निंबाळकर, जयसिंग दांगट, मनसेकडून विरेंद्र सैदाणे, आरती देशपांडे, पांडुरंग मण्यारे, सुशीलाबाई मोरे, तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून बाळासाहेब कोकरे, भवेश पिंपळकर हे रिंगणात आहेत. सचिन मुंगारे, पद्मा कांबळे हे दोघे अपक्ष म्हणून लढत आहेत. (प्रतिनिधी)
सर्व उमेदवारांमध्ये मोठी चुरस
By admin | Published: February 19, 2017 5:01 AM