पुणे : काँग्रेस नेते आबा बागूल, कमल व्यवहारे, मनीष आनंद यांच्यासह त्यांच्या पत्नी, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा पूजा आनंद, अशा चार बंडखोरांना काँग्रेसच्या प्रदेश शाखेने सहा वर्षांसाठी पक्षातून बडतर्फ केले आहे. त्याचबरोबर त्यांना महापालिकेच्या उमेदवारीपासून व महाविकास आघाडीतील अन्य पक्षांमधील प्रवेशापासून वंचित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी पर्वतीमधून महाविकास आघाडीच्या विरोधात, तर कमल व्यवहारे व मनीष आनंद यांनी अनुक्रमे काँग्रेसच्याच रवींद्र धंगेकर आणि दत्तात्रय बहिरट या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. मनीष आनंद यांच्या पत्नी पूजा आनंद या काँग्रेसच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा आहेत. त्या पतीच्या प्रचारात असल्याचे छायाचित्र प्रदेश शाखेकडे पाठवण्यात आल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
पक्षाचे जे पदाधिकारी, कार्यकर्ते या बंडखोरांबरोबर राहतील त्यांच्यावरदेखील कडक कारवाई करण्यात येईल, असे पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले. प्रदेश कार्यालयाकडून या बंडखोरांना पत्र, मेल पाठवण्यात येईल, त्याची प्रत शहर शाखेला येईल, अशी माहिती त्यांनी दिली. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी या बंडखोरांना आगामी काळात आपल्या पक्षात प्रवेश देऊ नये, महापालिकेची उमेदवारी देऊ नये, असाही निर्णय झाला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.