पुणे : साहित्य अथवा नाट्य संमेलनाचे खरे आकर्षण असते ते ‘स्मरणिका’. यंदाच्या नाट्य संमेलनाच्या स्मरणिकेत स्थानिकपासून ते देशभरात रुजलेल्या नाट्यचळवळीचा परामर्श घेतला जाणार आहे. त्यामुळे या स्मरणिकेत नाट्य संमेलनाच्या बिरुदाला साजेशा ‘अखिल भारतीय’चे दर्शन रसिकांना घडणार आहे.उस्मानाबाद येथे २१ ते २३ एप्रिलदरम्यान ९७वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन रंगणार आहे. संमेलन अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्याने आयोजकांची लगबग सुरू झाली आहे. अनेक वर्षांनी उस्मानाबादमध्ये नाट्य संमेलन होत असल्याने हे संंमेलन ‘हटके’ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. संमेलनाची स्मरणिका हा त्याचाच एक भाग. या स्मरणिकेमध्ये खऱ्या अर्थाने ‘अखिल भारतीय’चे प्रतिबिंब उमटावे, अशा स्वरूपाची विवेचनात्मक मांडणी करण्यात येणार असल्याची माहिती स्मरणिकेचे काम पाहाणारे पवन वैद्य यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ते म्हणाले, ‘‘मराठी नाट्य चळवळ बंगळुरू, गोवा यासारख्या भागात जिवंत ठेवण्याचे काम रंगकर्मी करीत आहेत. या चळवळीसह प्रायोगिक, समांतर, व्यावसायिक अशा रंगभूमींची दखल घेण्याबरोबरच स्थानिक रंगभूमीलाही स्मरणिकेत स्थान देण्यात येणार आहे. ‘‘झाडीपट्टी’ रंगभूमी ही विदर्भात विशेष लोकप्रिय आहे. नाटक किंवा मालिकांना जेवढा प्रतिसाद मिळत नाही, तेवढा झाडीपट्टीला मिळतो. तरीही, ही रंगभूमी अद्यापही कुणाला अवगत नाही. त्यामुळे पूर्वीच्या काळापासून आत्ताच्या रंगभूमीपर्यंतचा वेध स्मरणिकेमध्ये घेण्यात येणार आहे.’’(प्रतिनिधी)शीर्षकावर सुरू आहे खलस्मरणिकेमधील लेखांसाठी संजय पवार, पुरुषोत्तम बेर्डे, दत्ता भगत, मंगेश देसाई, रा. रं. बोराडे, अरुण काकडे, गिरीश पत्की यांच्यासह झाडीपट्टी करणाऱ्या देवेंद्र घोडके या प्रसिद्ध अभिनेत्याशी लेखासंदर्भात संपर्क साधण्यात आला आहे. तसेच निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता यांचे रंगभूमीविषयी लेखही प्रसिद्ध केले जाणार आहेत. या स्मरणिकेसाठी ‘नाट्यकल्लोळ’, ‘नाट्यनिनाद’, नाट्यगंध’, ‘नाट्यदर्पण’, नाट्यसंपदा’, नाट्य-अविष्कार’ अशी काही नावे सुचविण्यात आली आहेत. लवकरच एका शीर्षकावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.
स्मरणिकेतून ‘अखिल भारतीय’ दर्शन
By admin | Published: March 31, 2017 3:15 AM