पुणे: सध्या अखिल भारतीय मराठा महासंघात उभी फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. कारण महासंघाचे अध्यक्ष असलेल्या शशिकांत पवार यांनी सोमवारी एक पत्रक काढत सरचिटणीस असलेल्या राजेंद्र कोंढरे यांची हकालपट्टी केल्याची घोषणा केली होती. तर त्यानंतर आज राजेंद्र कोंढरे यांनी महासंघाच्या काही पदाधिकाऱ्यासमवेत पुण्यात पत्रकार परिषद घेत शशिकांत पवार यांनी गैरव्यवहार केल्यामुळे त्यांचे अध्यक्षपदाचे सर्व अधिकार गोठविण्यात आल्याचे सांगितले. यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघातील या आरोप-प्रत्यारोपानंतर मोठा पेच निर्माण झाला आहे. महासंघात मोठी फूट फडल्याचेही दिसत आहे.
आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या (akhil bhartiya maratha mahasangh) सभासदांची आणि पदाधिकाऱ्यांची पुण्यात सर्वसाधारण सभा पार पडली. शशिकांत पवार यांनी नियमबाह्य पद्धतीने आपल्या पदाचा गैरवापर केला. पवार यांच्याकडून केलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. यामुळे शशिकांत पवार यांचे अध्यक्षपदाचे सर्व अधिकार गोठविण्यात आल्याची माहिती कोंढारे यांनी सर्वसाधारण सभेत दिली.
अखिल भारतीय मराठा महासंघ मध्यवर्ती कार्यालयाच्या मुंबई येथील इमारत पुनर्विकास गैरव्यवहाराबद्दल सभेला लेखी माहिती देऊन, संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहार व नुकसानीची नोंद घेऊन शशिकांत पवार यांचे अध्यक्षपदाचे सर्व अधिकार गोठविण्यात आल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.