पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या असून, ४ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नाट्य परिषदेचे नवीन नियामक मंडळ ७ मार्च रोजी अस्तित्वात येणार आहे. अत्यल्प कालावधी हाती राहत असल्याने आणि नाशिक आणि मुक्ताईनगर शाखांनी निमंत्रण मागे घेतल्याने यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन बारगळणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शासनाचे आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असल्याने यंदा नाट्यसंमेलनाचे अनुदानही मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या नियामक मंडळाची मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली. नाट्यसंमेलन अध्यक्षपदाबरोबरच संमेलन स्थळाबाबतचा निर्णय नवीन कार्यकारिणीने घ्यावा, अशी भूमिका नियामक मंडळाच्या बैैठकीमध्ये घेण्यात आली. अध्यक्षपदाचे नाव आणि स्थळ याबाबत वादळी चर्चा झाल्याने सदस्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे महत्वाचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. नाट्य संमेलनाचा निर्णय मार्चअखेरपर्यंत न घेतल्यास शासनाकडून मिळणारे २५ लाख रुपयांचे अनुदान परत जाण्याची शक्यता असल्याने संमेलनाध्यक्ष आणि संमेलन स्थळाची घोषणा करावी, याबाबत सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, एकमत होऊन न शकल्याने हे निर्णय स्थगित ठेवण्यात आले होते. ९ जानेवारी रोजी निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहितेच्या कारणामुळे नियामक मंडळाला नाट्यसंमेलनाबाबत कोणताही निर्णय घेता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. नवे नियामक मंडळाने ७ मार्च रोजी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे किती आमंत्रणे येतात ते पाहावे लागेल.
निवडणुकीमुळे बारगळणार अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 6:09 AM