पुणे - अखिल भारतीय खुल्या स्नूकर स्पर्धेत दिल्लीच्या अनुज उप्पल, मुंबईच्या शिवम अरोरा, क्यू मास्टर्स आनंद रघुवंशी, क्यू क्लबच्या ज्ञानराज सथपती व औरंगाबादच्या कृष्णराज अरकोड यांनी गुरूवारी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.विमाननगर येथील क्यू क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ज्ञानराजन सथपतीने पूना क्लबच्या जमशेद गारडा याचा ३-२ असा निसटता पराभव करून आगेकूच केली. ज्ञानराजन याने पहिले दोन फ्रेम ५४-३७, ४३-३० असे जिंकून २-० अशी आघाडी घेतली. पण त्यानंतर जमशेद यानेही सलग दोन फ्रेम ७५-४६, ६०-१६ असे जिंकून सामन्यात २-२ अशी बरोबरी केली. निर्णायक फ्रेममध्ये ज्ञानराजन याने जमशेद याला कोणतीही संधी न देता ५८-३३ अशा फ्रेम गुणांसह सामना खिशात घातला.भारताचे प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अनुज उप्पलने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत क्यू क्लबच्या सद्दाम शेख याच्यावर ८१-३, ६०-२०, ६१-१० ने मात केली. आनंद रघुवंशीने आशिष चावला याचे आव्हान ७३-२९, ५१-१७, ७५-१ असे संपुष्टात आणले. राष्ट्रीय खेळाडू शिवम अरोरा याने कैवल्य चव्हाण याचा ६९-६०, ८०-५१, ८५-४३ असा सहज पराभव करून अंतिम १६ खेळाडूंमध्ये आपले स्थान पक्के केले.हसन बदामी, अन्शुल दांडेकर, मोहीत वर्मा, गणेश जाधव, अमित गुनानी, संतोष धर्माधिकारी, अमिर पराशर, शुभम रोकडे, ओंकार अहमद, हुसेन खान, लियाकत अली, रोविन डिसुझा, विजय नचानी, रणवीर दुग्गल, नरेश अहीर, निसर्ग पटेल, अनुपम झा, अमोल अब्दागिरी, निलेश पाटणकर, दिनेश कुमार, अभिजीत रानडे, अलि हसन, धैर्य भंडारी या खेळाडूंनी आपापल्या गटातून बाद फेरीत प्रवेश केला.निकालअनुज उप्पल (दिल्ली) वि.वि. सद्दाम शेख (क्यू क्लब) ८१-३, ६०-२०, ६१-१०. आनंद रघुवंशी (क्यू मास्टर्स) वि.वि. आशिष चावला (न्यू क्लब) ७३-२९, ५१-१७, ७५-१. शिवम अरोरा (मुंबई) वि.वि. कैवल्य चव्हाण (क्यू क्लब) ६९-६०, ८०-५१, ८५-४३, ज्ञानराजन सथपती (क्यू क्लब) वि.वि. जमशेद गारडा (पुना क्लब) ५४-३७, ४३-३०, ४६-७५, १६-६०, ५८-३३. कृष्णराज अरकोड (औरंगाबाद) वि.वि. अमोल राईकर (क्यू क्लब) १-०, ५९-२०, ६५-१७.
अखिल भारतीय खुल्या स्नूकर स्पर्धेत अनुज उप्पल, शिवम अरोरा, आनंद रघुवंशीची आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 9:24 PM