लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाने कोरोनाची ‘ब्रेक द चेन’ करण्याकरीता शनिवार, रविवार म्हणजे वीक एंडला कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील गूळ, भुसार बाजारासह भाजीपाला, फळ विभाग, फुल बाजार आणि जिल्ह्यात मांजरी, मोशी व अन्य सर्व बाजार दोन दिवस बंद राहणार आहेत. बाजार बंद ठेवण्यासाठी दि पूना मर्चट चेंबरने पाठिंबा दिला आहे.
राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चेन ब्रेक करण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहे. यात वीक एंडला दोन दिवस कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डातील सर्व विभाग शनिवार व रविवार पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे.
तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे शनिवार आणि रविवार शेतमाल घेऊन येऊ नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी केले आहे.