लोणावळा : निसर्गसंपदेचा भरघोस वारसा लाभलेल्या मावळ तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्याचा विसर सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांना पडला आहे. मागील दशकभरातील विधानसभा व लोकसभा निवडणुका मावळ तालुक्याच्या पर्यटन विकासाला प्राधान्य देण्याच्या अजेंड्याखाली लढविल्या गेल्या. मात्र, त्याच मावळ तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या अजेंड्यावर कोठेही तालुक्याच्या पर्यटन विकासाचा विषय नाही. प्रचारपत्रकांत रस्ते, गटारे, पिण्याच्या पाण्याची समस्या व रखडलेली इतर कामे या पारंपरिक विषयांचा समावेश आहे. राज्याची आर्थिक राजधानी मुंबई व शैक्षणिक राजधानी पुणे या दोन्हींच्या मध्यावर असलेल्या मावळ तालुक्याचे सर्वांनाच आकर्षण आहे. तालुक्यात जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले लोणावळा व आजुबाजूचा परिसर, जगप्रसिद्ध कार्ला, भाजे व बेडसा लेणी, राजमाची, लोहगड, तुंग, तिकोणा, इंदोरीसारखे इतिहासाची साक्ष देणारे किल्ले, वळवण, लोणावळा, भुशी, पवना, वडिवळे, आंद्रा, सोमवडी, उकसान, शिरोता, ठोकळवाडीसारखी धरणे, आंदर व पवन मावळांचा निसर्गरम्य परिसर आहे. (वार्ताहर)
पर्यटन विकासाचा सर्वच पक्षांना विसर
By admin | Published: February 18, 2017 3:13 AM