सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राज्यमंत्री विजय शिवतारे व पुरंदरचे काँग्रेस नेते संजय जगताप यांनी आज सकाळी स्वतंत्र पॅनल उभे करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिवसभरातील राजकीय घडामोडींनंतर राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शेतकरी कृती समितीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर मात्र काँग्रेसचे नेते संजय जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही.शिवतारे यांनी सोमेश्वर कारखाना निवडणुकीत शेतकरी कृती समितीला पाठिंबा दिल्याने दोन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. माळेगाव, छत्रपती कारखाना निवडणुकीबाबत देखील हीच भूमिका असल्याचे यांनी सांगितले.पाच दिवसांपसून कृती समितीने आपल्या उमेदवारांची यादी गुलदस्त्यात ठेवली होती. तर जागेच्या वाटाघाटीवरून शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे व काँग्रेसचे नेते संजय जगताप यांच्यात बिनसल्यानंतर आज सकाळी स्वतंत्र पॅनल उभे करण्याचा निर्णय घेतला होता. तर विजय शिवतारे यांनी अगोदरच स्वतंत्र पॅनल उभे करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे शेतकरी कृती समिती, शिवसेना व काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांनी आज सकाळपासूनच बारामती येथे तळ ठोकला होता. त्यामुळे सकाळी बारा वाजेपर्यंत तर सोमेश्वरची निवडणूक चौरंगी होण्याची चिन्हे होती. तशा उलटसुलट चर्चाही परिसरामध्ये झडत होत्या. यामुळे अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी काय राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर अडीच वाजता वाटाघाटीनंतर शेतकरी कृती समिती व शिवसेना यांनी निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठ दिवसांपूर्वी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ‘सोमेश्वर’च्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करणार असल्याचे जाहीर करत सतीश काकडे हे सक्षम नेतृत्व नसल्याची टीका केली होती. मात्र आज शिवतारेंनी सतीश काकडेंशी चूल थाटली आहे. शेतकरी कृती समिती प्रचाराच्या नारळाला कृती समितीच्या व्यासपीठावर बसणाऱ्या संजय जगताप यांना बाजूला करत कृती समिती व शिवसेनेने वेगळी चुली थाटली. संजय जगताप काय भूमिका घेणार याकडे आता सर्व सभासदांच्या नजरा लागल्या आहेत. जगताप सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीपासून अलिप्त राहणार की राष्ट्रवादीबरोबर जाणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, संजय जगतापांना गळ लावण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी सरसावले असल्याचे समजते.
प्रस्थापितांविरोधात सर्वपक्षीय एकजूट
By admin | Published: April 01, 2015 4:56 AM