राज्यपालांविरोधात सर्वपक्षीय आक्रमक; पुणे बंदला व्यापारी महासंघाचा जाहीर पाठिंबा, दुकाने बंद ठेवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 08:51 PM2022-12-08T20:51:52+5:302022-12-08T20:52:00+5:30
गुरुवारपासून शाळा, संस्था, कार्यालयांना आवाहन करण्यात येणार
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध म्हणून शिवप्रेमी संघटनांनी १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक दिली आहे. यात मुस्लिम, शिख, दलित संघटनांनीदेखील सहभाग घेण्याचे जाहीर केले आहे. याबाबत गुरुवारपासून शाळा, संस्था, कार्यालयांना आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुणे व्यापारी महासंघही पुणे बंदला पाठिंबा देणार असल्याचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले आहे.
संभाजी बिग्रेड,काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना,आर.पी.आए.ई .सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यानी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या कार्यालयात भेट घेतली. व छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अवमान केल्याच्या निषेधार्थ पुणे बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यानंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सभेमध्ये त्यांच्या आवाहनावर चर्चा करण्यात आली. पुणे बंद मध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय वयापारी महासंघाकडून घेण्यात आला आहे.
सर्वपक्षीय भूमिका स्पष्ट करून त्यांचा बंदला पाठिंबा
राज्यपाल कोश्यारी हे महाराष्ट्राच्या थोर विभूतींबाबत वारंवार अवमानकारक बोलत आहेत. आता तर त्यांनी छत्रपती शिवरायांनाच जुना आदर्श केले आहे. भाजपचेच वाचाळवीर सुधांशू त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मनाला येईल त्याप्रमाणे काहीही बरळत आहेत, त्यामुळे हा सगळा ठरवून केला जात असलेला प्रकार असल्याची शंका सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली होती. याविरोधात आवाज उठविणे शिवप्रेमी म्हणून कर्तव्यच आहे, त्यामुळे केंद्र सरकारने कोश्यारी यांना त्वरित राज्यपालपदावरून हटवावे, यासाठी पुणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलान आहे. त्याचबरोबर भाजपच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी यासाठी हा बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यातील संस्था, सरकारी, खासगी कार्यालयांमध्ये जाऊन तिथे सर्वपक्षीय भूमिका स्पष्ट करून त्यांचा बंदला पाठिंबा मिळवण्यात येणार आहे. गुरुवारपासूनच ही मोहीम सुरू करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले होते. त्यातच आता पुणे व्यापारी महासंघाने पुणे बंदला पाठिंबा दर्शवला आहे.