बारामती : बारामती येथे कृषि प्रदर्शनात मी कृषिमंत्री म्हणून आलो आहे . इथे मी राजकीय पुढारी म्हणून आलो नाही. शरद पवार यांच्या पासून मी रोहित पवार यांच्यापर्यंत सगळ्यांची नावे घेतली. सगळे पवार चांगले आहेत. त्यांची ‘पॉवर’ अशीच राहो, हीच ईश्वचरणी प्रार्थना आहे. खूप चांगले प्रदर्शन भरवले आहे. २०२३ सालातील हे सगळ्यात चांगले प्रदर्शन आहे, अशा शब्दात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पवार कुटुंबियांवर स्तुतीसुमने उधळली.
नोव्हेंबरमध्ये कृषिमंत्री सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या पार्श्वभुमीवर सत्तार यांच्याबाबत बारामतीत उत्सुकता होती. आज अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आयोजित कृषक २०२३ ची पाहणी केली. यावेळी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी सत्तार यांचे स्वागत केले. नंतर सत्तार यांनी पत्रकार परीषदेत पवार कुटुबियांसह कृषि प्रदर्शनाचे कौतुक केले.
सत्तार म्हणाले, कृषी प्रदर्शन मध्ये फोटोसह माहिती लिहिलेली असते. पण इथे ‘डेमो’ पाहायला मिळाले. इथली शेती बघितल्यानंतर शरद पवार ,अजित पवार ,सुप्रिया सुळे आणि राजेंद्र पवार यांचे शेतीमध्ये असलेलं योगदान पाहायला मिळते. जुनी शेती नवीन करण्याचे काम शरद पवारांनी केले. इथे तंत्रज्ञान वापरून कशी शेती केली जाते, याचे प्रात्यक्षिक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने इथे येऊन हे प्रदर्शन पाहिले पाहिजे, त्याचे अनुकरण केलं पाहिजे. या ठिकाणी केल्या जाणाऱ्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांना होतो. येथे काही मिळालेल्या गोष्टी ,प्रयोगावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील राहु, इथे येऊन प्रदर्शन पहावे आणि तशी शेती करावी, असे माझे शेतकऱ्यांना आवाहन आहे. अशाच शाखा विदर्भ आणि मराठवाड्यात सुरू करून द्याव्यात, असे सत्तार म्हणाले.
शेतकऱ्यांना मोफत वीज देणे हा धोरणात्मक निर्णय आहे .यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर निर्णय घेतील. कृषी मंत्री या नात्याने माझे मागणी करणे काम आहे. शेतकऱ्यांना १ रुपयात विमा द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मार्च पर्यंत येणाऱ्या बजेटमध्ये योग्य ती तरतूद केल्याचे सत्तार यांनी सांगितले.